मंत्री दादा भुसे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी; हिंदी सक्तीसंदर्भात समजूत काढण्याचा प्रयत्न

Dada Bhuse : राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेच्या अंमलबजावणीवरून वाद सुरू आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिलीपासून शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. यातच आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. हिंदी सक्तीबाबत दादा भुसे राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
यावेळी मंत्री दादा भुसेंसह शिक्षण खात्यातील सर्व अधिकारी राज ठाकरेंना हिंदी भाषा सक्तीबाबत माहिती देणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अर्ध्या तासापासून चर्चा सुरु आहे. या भेटी आधी दादा भुसे माध्यमांसोबत संपर्क साधताना म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून जी काही भूमिका घेतलेली आहे, ती भूमिकेत काय मुद्दे आहेत हे आम्ही राज ठाकरे यांच्यासमोर ठेवणार आहोत. त्यांचे काही मुद्दे असतील, त्या मुद्द्यांवर शासनाची बाजू त्यांच्यासमोर आम्ही ठेवू. मला विश्वास आहे की, चर्चा सकारात्मक होईल. त्यांच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे आम्ही त्याचे स्वागत करू.
हेही वाचा – आमदारकी, खासदारकी भोगली पण एक शब्द तरी पूर्ण केला का? विखेंचा लंकेंवर निशाणा
दरम्यान, राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा तिसऱ्या पर्यायी भाषेच्या रूपात शिकवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी विरोध केला. या मुद्द्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. राज्यभरातून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ, अशा सूचना दिल्या होत्या. यानंतर आता दादा भुसे राज ठाकरेंमध्ये चर्चा होत आहे. यात दादा भुसे राज ठाकरेंची समजूत काढण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.