‘नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई : दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे कृषी विभागातर्फे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै या कृषि दिनानिमित्त आयोजित कृषि पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे यासह राज्यातील कृषि पुरस्कार विजेते उपस्थित होते.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२३ कोल्हापुर विभाग मधून मु.पो.तळसंदे, ता.हातकणंगले, येथील डॉ.संजय ज्ञानदेव पाटील यांना तर २०२४ चा ठाणे विभागातून जि.पालघर, ता. तलासरी, मु.पो.ब्राम्हणगाव (झाई बोरीगाव) येथील यज्ञेश वसंत सावे यांना तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले. कृषि विभागात प्रातिनिधीक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
राज्यपाल वर्मा म्हणाले की, भारताची संस्कृती, परंपरा आणि समृद्धीचा पाया शेतकरी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेकदा शेतकऱ्यांचे कल्याण ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळत असून पशुपालक आणि मत्स्यव्यवसायिकांनाही कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे.’बीज ते बाजार’ ही संकल्पना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ आणि योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरत आहे.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, ड्रोन तंत्रज्ञान, मृदा आरोग्य पत्रिका आणि नैसर्गिक खतांचा वापर यासारख्या उपक्रमांमुळे कृषी उत्पादकतेत वाढ होत आहे. राज्य शासनाने शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित, हवामान अनुकूल आणि बाजारपेठाभिमुख करण्यासाठी अनेक परिवर्तनशील उपक्रम हाती घेतले आहेत. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत शेततळी, शेततळ्यांचे अस्तरीकरण आणि विविध जलसाठा संरचनांची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली आहे. हजारो शेततळी पूर्ण झाली असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक सहाय्य जमा करण्यात आले आहे. या उपक्रमांमुळे हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे शक्य झाले आहे. महाराष्ट्र नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरू शकतो. नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि समृद्धीही वाढेल. यासोबतच देशी गोवंशाचे संवर्धन आणि संरक्षण यावरही विशेष भर देण्याची गरज आहे. गोआधारित जैविक घटक नैसर्गिक शेतीचा महत्त्वाचा आधार असल्याचे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.





