रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वय समितीवर विलास लांडे यांची नियुक्ती
शिक्षण विश्व: कर्मवीरांच्या विचारांचा वारसा अधिक बळकट करण्यासाठी निवड

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
देशातील अग्रगण्य रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वय समितीवर माजी आमदार तथा राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या अनुभवाचा संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विलास लांडे यांनी शिक्षण, समाजकारण आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव, प्रभावी नेतृत्व आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टीकोनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही वाचा
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशात, विलास लांडे यांची नियुक्ती ही त्यांच्या शैक्षणिक नेतृत्वाची आणि समाजहितासाठी केलेल्या योगदानाची गौरवपूर्ण दखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, नव्या जबाबदारीतून ते संस्थेच्या गुणवत्ता वृद्धी, शैक्षणिक विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योगदान देतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वय समितीवर झालेल्या या नियुक्तीमुळे शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, विविध स्तरांतून विलास लांडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वय समितीवर काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी गौरवाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन’ या विचारांचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहीन. पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, संस्थांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी सर्व घटकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करणार आहे. संस्थेच्या नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”
– विलास लांडे, माजी आमदार.





