ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा निवडणुकीला तुतारीसमोर पिपाणीचे मोठे आव्हान

लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार गटाला पिपाणी पुन्हा अडचणीत आणणार

महाराष्ट्र : पक्षाचा वारसा सांगणारे चिन्हच ताप होऊ शकते हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. शरद पवार गटाविरोधात या चिन्हाने निर्णायक कामगिरी बजावली. दोन निवडणूक चिन्हातील काही साम्यामुळे उमेदवारांना फटका बसला. मतांच्या काही फरकाने उमेदवार पडला. तुतारीसमोर लोकसभेत पिपाणी चिन्हाने मोठे आव्हान उभं केलं. त्याविरोधात शरद पवार गटाने आगपाखड केली. तरीही विधानसभेत या चिन्हाचा ताप पक्षाच्या डोक्याला राहणार आहे. आता या नवीन पक्षामुळे सुद्धा शरद पवार गटाला विधानसभेत सजग राहावे लागणार आहे.

निवडणूक आयोगाने विनंती केली अमान्य

लोकसभा निवडणुकीला तुतारीसमोर पिपाणीने मोठे आव्हान उभं केलं होते. त्याचा फटका काही मतदारसंघात दिसून आला. उमेदवार पडण्यामागे पिपाणीच कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यावर शरद पवार गटाने हे चिन्ह गोठवण्यासाठी, पिपाणी चिन्ह हटवण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. आयोगाने ही विनंती अमान्य केली. तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी हे चिन्हं वेगळं दिसतं. हा फरक मतदारांच्या सहज लक्षात येण्याजोगा असल्याचा दावा आयोगाने केला आहे. त्यामुळे लोकसभेसारखाच विधानसभेला फटका बसू नये यासाठी शरद पवार गटाला त्या त्या विधानसभा मतदारसंघात विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

या मतदारसंघात पिपाणीला पसंती

लोकसभा मतदारसंघात पिपाणीचा तुतारीला फटका बसल्याचे समोर आले. चिन्ह साधर्म्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. अनेक मतदारांनी तुतारी ऐवजी पिपाणीला भरभरून मतदान केले, ते संभ्रमामुळे केल्याचा दावा शरद पवार गटाने केला. शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहिल्यानगर, बीड या मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाल्याचे दिसून आले.

या पक्षामुळे झाला ताप

आता न्यू राष्ट्रीय समाज पक्ष पिपाणी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरचिटणीस रामचंद्र घुटुकडे यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आपल्या सर्व उमेदवारांसाठी पिपाणी हे चिन्ह न्यू राष्ट्रीय समाज पक्ष घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवार गटासह महादेव जानकर यांच्याही अडचणी वाढणार असल्याचे दिसते. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा ही राष्ट्रीय समाज पक्षासारखाच असल्याने महादेव जानकर यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. पिपाणी चिन्हाचा आग्रह धरला जाणार असल्याने लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार गटाला पिपाणी पुन्हा अडचणीत आणणार असल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button