केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर
छेड काढणारा टावळखोर हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर या आधी देखील असे गुन्हे दाखल

जळगाव : हा प्रकार आज माझ्या घरात घडला आहे, म्हणून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं नाही. आज राज्यात अनेक महिलांना या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यातल्या अनेक महिला अशा छेडछाडीची तक्रार करायला देखील घाबरतात. हा आज सामाजिक प्रश्न बनला आहे. मात्र रक्षा खडसे यांची मुलगी स्वत: तक्रार करण्यासाठी पुढे आली ही मोठी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असल्याने एकंदरीतच आजोबा एकनाथ खडसे यांनी आपल्या नातीचं कौतुक यावेळी केलेलं बघायला मिळालं आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये जत्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुनः ऐरणीवर आला आहे. यावर नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. छेड काढणारा टावळखोर हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर या आधी देखील असे गुन्हे दाखल आहे. छेड काढताना मुलींच्या सोबत असलेल्या पोलिसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसाला देखील मारहाण करण्यात आली. एवढी हिम्मत होते कारण या गुंडांना स्थानिक लोक प्रतिनिधींचा पाठिंबा आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलले पाहिजे, असंही एकनाथ खडसे यांनी म्हंटलं आहे.