मुंबईत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; १,७४५ कोटींचे ३४९ किलो कोकेन जप्त

मुंबई | अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबई आणि आसपासच्या परिसरात राबवलेल्या ‘व्हाईट स्ट्राईक’ या विशेष मोहिमेत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत सुमारे १,७४५ कोटी रुपये किमतीचे ३४९ किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले असून, हे अमली पदार्थ क्रिकेटचे ग्लोव्हज आणि पॅड्समध्ये लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
एनसीबीच्या माहितीनुसार, या रॅकेटवर गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली होती. गुप्त माहितीच्या आधारे नवी मुंबईतील कळंबोली येथील केडब्ल्यूसी वेअरहाउसिंग कॉम्प्लेक्सजवळ एका मारुती सुझुकी सुपर कॅरी वाहनाला अडवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, खोक्यांमध्ये ठेवलेल्या क्रिकेट पॅड्स आणि ग्लोव्हजच्या आत कोकेनची १३६ पाकिटे (प्रत्येकी १ किलो) आढळून आली. या ठिकाणावरून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा
भोरमधील 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या; ६५ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात
ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केल्यानंतर भिवंडीतील आणखी एका गोदामाची माहिती मिळाली. त्यानुसार एनसीबीने भिवंडीतील रेहनाळ गावातील लक्ष्मण कंपाउंडमधील गोदामावर छापा टाकला. या कारवाईत आणखी २१३ पाकिटे जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३४९ किलो कोकेन हस्तगत करण्यात आले.
प्राथमिक तपासात हे कोकेन परदेशातून आयात केलेल्या यंत्रसामग्रीच्या पोकळ भागांमध्ये लपवून भारतात आणले जात असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक पाकीट नऊ थरांच्या पॉलिथीनमध्ये गुंडाळून त्यावर काळ्या ग्रीसचा थर लावण्यात येत होता, जेणेकरून ते सहज ओळखता येऊ नये. हे अमली पदार्थ आधी गोदामांमध्ये साठवून ठेवले जात आणि त्यानंतर क्रिकेट साहित्याचा वापर करून विविध ठिकाणी वितरित केले जात असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.





