पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर

पुणे : शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढल्यामुळे पारा ३९ अंशांवर पोहोचला. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचल्यामुळे, यंदा उन्हाचा चटका नकोसा करणार, असे संकेत दिसत आहेत.
यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा पारा ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहचला होता. मागील ८ दिवसांपासून उकाडाही वाढला आहे. परिणामी शहरातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली असून, १० ते ११ अंशांवर असलेले किमान तापमान आज १४ अंशापर्यंत पोहोचले. दरम्यान, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान ३९ अंश इतके नोंदविले गेले.
हेही वाचा – “नेता होण्यासाठी दुसऱ्या समाजांना शिव्या देण्याची…”, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला?
त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागांत उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. विशेषत: शिरूर, कोरेगाव पार्क, चिंचवड, एनडीए, पुरंदर, तळेगाव परिसरात ऊन आणि उकाडा अधिक जाणवत आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे, आकाश निरभ्र राहील. कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
पुढील दोन दिवस राज्यातील रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांत हवामान उष्ण राहणार आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. अकोला येथे सर्वाधिक ३८.५, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण- गोव्यातील काही जिल्ह्यांतील कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले आहे.
शहरासह जिल्ह्यातील काही भागांतील कमाल तापमान
शिरूर ३९, कोरेगाव पार्क ३८.१, चिंचवड ३७.७, एनडीए ३७.३, पुरंदर ३७.२, तळेगाव ३७.१, वडगावशेरी आणि मगरपट्टा ३६.६, शिवाजीनगर आणि पाषाण ३६.२, हवेली ३५.८, भोर ३५, बारामती ३४.८, नारायणगाव ३४,