Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पक्षाघाता’च्या रुग्णांसाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करा’; मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना ‘गोल्डन अवर’ मध्ये तातडीने आणि अत्याधुनिक उपचार देण्यासाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ हा दूरस्थ पद्धतीने रोबोटिक उपचार सुविधा देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

गेल्या काही वर्षांत स्ट्रोक (पक्षाघात) रुग्णसंख्येत वाढ होत आहे.  अशा रुग्णाना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक सुविधा वेळेत न मिळाल्यास  रुग्णाला कायमस्वरूपी पक्षाघाताचा धोका वाढतो.  ही परिस्थिती लक्षात घेऊन तालुका व जिल्हास्तरीय शासकीय रुग्णालयांमध्ये स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक  ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आरोग्यमंत्र्यांचा मानस आहे.

आरोग्यसेवा आयुक्तालयात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या अनुषंगाने प्राथमिक बैठक झाली. बैठकीला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमा खापरे, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, केईएमचे वरिष्ठ हायब्रीड न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे उपस्थित होते.

मुंबईतील केईएम रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रोक रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा चाचणी सन 2020 मध्ये करण्यात आली होती. डॉ. नितीन डांगे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना ‘हब आणि स्पोक’ प्रणाली द्वारे  ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सुविधा देण्यात येणार आहे.

हेही वाचा –  ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजने’ची प्रभावी अंमलबजावणी करा’; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संकल्पनेनुसार मुंबईतील केईएम येथे मुख्य रोबोटिक नियंत्रण केंद्र (Hub) कार्यरत असेल, तर जिल्हा व तालुकास्तरीय रुग्णालयांमध्ये दुय्यम रोबोटिक प्रणाली (Spoke Centers) कार्यरत असतील. संगणकीय आणि दूरसंचार प्रणालीद्वारे हे दोन्ही घटक एकमेकांशी जोडले जातील. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर आपल्या नियंत्रण प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये उपस्थित वैद्यकीय पथकाच्या मदतीने न्यूरोअँजिओग्राफी, स्ट्रोक इंटरव्हेन्शन प्रक्रिया पार पाडतील.

आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात ११ ठिकाणी कॅथलॅब सुरू करण्यात येत आहेत. यापैकी पाच केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सुविधा सुरू करण्याचा विचार आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर ही योजना टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तारण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले बहुतांश इन्फ्रास्ट्रक्चर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असून, अतिरिक्त खर्च मुख्यत्वे रोबोटिक यंत्रणेसाठी होणार आहे. ‘टेलीमेडिसिन’ आणि ‘ई-संजीवनी’ प्रणालीच्या माध्यमातून ही सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

याबाबत आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांनाही महानगरांप्रमाणे अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. स्ट्रोक रुग्णांसाठी ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे रुग्णांना मोठ्या शहरात हलविण्याऐवजी त्यांच्या जवळच्या शासकीय रुग्णालयात ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सारखी आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button