breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दौंड परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बहुउद्देशीय नूतन इमारतीचे उद्घाटन

पुणे | दौंड परिसरातील पायाभूत सुविधांसह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्यावतीने ७ एकर परिसरात सीबीएसईची शाळा उभारून परिसरातील विद्यार्थ्यांकरिता दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येईल असेही ते म्हणाले.

दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बहुउद्देशीय नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक रमेश थोरात, दौंड शुगर प्रा. लि. चे संचालक वीरधवल जगदाळे, तहसीलदार अरूण शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव तडस, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे, उपाध्यक्षा अलका काटे, संचालक मंडळ, लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, १९६० साली स्थापन करण्यात आलेल्या दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने १ कोटी ९५ लाख रुपये खर्चून ही परिसराच्या वैभवात भर घालणारी इमारत उभारली आहे. सेवा सहकारी संस्था ही संबंधित गावाची नाडी असते. संचालक मंडळांनी संस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने करावा, चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सर्वांनी मिळून सहकार चळवळ टिकविण्यासाठी प्रयत्न करुया, त्यासाठी आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

हेही वाचा     –      ‘हे हिंदूंचे राष्ट्र, त्यामुळे सर्वांत प्रथम हिंदूंचे हितच पाहिले जाईल’; मंत्री नितेश राणे 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात ३ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यापैकी राज्यात ३५ लाख घरे बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ३, ५ आणि ७.५ एचपीपर्यंतच्या कृषीपंपांची वीज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरिता तालुक्यातील महिलांच्या खात्यात ७० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आगामी काळात योजना सुरु राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नये. राज्य सरकार व केंद्र शासन मिळून विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

जानाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ४२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून फुरसुंगीपर्यंत बोगद्याद्वारे पाणी आणण्यात येणार असून यामुळे ३ टीएमसीपर्यंत पाण्याची बचत होणार आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात नागरिकांना दर्जेदार सेवा मिळण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

वैशाली जगदाळे यांनी दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वाटचालीबाबत माहिती दिली. या परिसरात आगामी काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा स्थापन व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या हस्ते ‘लेक लाडकी योजने’अंतर्गत कुरकुंभच्या लाभार्थी ओवी रवींद्र घुले यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

कार्यक्रमास सहकारी संस्थांचे सहायक निबंधक हर्षद तावरे, सहायक निबंधक देविदास मिसाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी अक्षदा शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button