Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आरोग्य समृद्ध महाराष्ट्रासाठी लोकसहभागातून ‘ग्रामीण आरोग्य’ संपन्न करण्यावर भर द्यावा’; मंत्री प्रकाश आबीटकर

पुणे : ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामुहिक वर्तणुकीत बदल घडविणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजविण्यावर या मोहिमेत भर देण्यात आल्यामुळे लोकसहभागाच्या माध्यमातून आरोग्य संपन्न गाव करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले.

या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे व या ठिकाणी कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका व आशा तसेच ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. एकात्मिक कार्यप्रणाली व पारदर्शक मूल्यांकन प्रणालीच्या आधारे, या अभियानातून गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहे, आरोग्य समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासोबतच हे अभियान यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, असेही श्री. आबिटकर म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय येथे आयोजित ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ विभागीय कार्यशाळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, आरोग्य विभागाचे प्रधान डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मारुती नवले आदी उपस्थित होते.

श्री. आबीटकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्याचा आणि त्याला आवश्यक ती निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला आज पासून सुरुवात  करण्यात आली, या अभियानात ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासोबतच लोकसहभागाच्या माध्यमाचा आरोग्याचा जागर करण्यात येणार आहे. हे एक शासकीय अभियान न राहता यामध्ये अधिकाधिक लोकसहभाग घेत व्यापक आरोग्य चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करुया.

ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासोबतच निरोगी जीवनशैलीच्या दृष्टीकोनातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अभियान यशस्वी करण्यासाठी विविध घटकांसोबत चर्चा करावी, त्यांच्या सूचनांचा स्वीकार करुन समन्वयाने काम करावे, आगामी काळात त्याप्रमाणे आवश्यक ते बदल करण्यात येतील.

हेही वाचा –  सोळु येथे एमआयटी महाविद्यालयाचा डिजिटल साक्षरता जनजागृती कार्यक्रम उत्साहात

राज्यातील एकही नागरिक आरोग्य योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी कटिबद्धतेने काम करावे.  हे अभियान आपल्या नागरिकांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी राबविण्यात येत असून, ती चळवळ म्हणून यशस्वी करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या अभियानाच्या यशासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येईल.

राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. गावपातळीपर्यंत आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर देण्यात आले. विभागामार्फत एकात्मिक आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांसारख्या राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहोचवून नागरिकांना आरोग्य सुविधा दिल्या देण्याचे काम करावे. योजना यशस्वी करण्याकरिता लोकसहभागाची चळवळ म्हणून पुढे आले पाहिजे.

नवीन पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि कर्करोगासारख्या आजाराला रोखण्याकरिता राज्यातील १४ वर्षे वयोगटातील ९ लाख ८४ हजार मुलींचे (ज्यांनी चौदावा वाढदिवस साजरा केला आहे परंतु पंधरावा वाढदिवस अद्याप झालेला नाही) मोफत लसीकरण करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. या लसीकरणाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. शिबीराला भेटी देवून माहिती घ्यावी, असे आवाहन श्री. आबीटकर म्हणाले.

श्री. जगदाळे म्हणाले,  पुणे जिल्ह्यात ‘मॉडेल पीएचसी’च्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामीण स्तरावर रुग्ण कल्याण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या समित्या पुन्हा कार्यान्वित कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. विनायक यांनी ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाविषयी माहिती देवून ते पुढे म्हणाले,  आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नव्हे तर सार्वजनिक बाब आहे, त्यामुळे आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयाला केंद्रबिंदू मानून विविध आरोग्य विषय योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्याकरिता तळागळापर्यंत पोहोचवून काम करावे, येत्या काळात हे अभियान शहरी भागात राबविण्यात येईल, असेही डॉ. विनायक म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य विषयावर व्यापक स्वरुपात जनजागृतीची आवश्यकता आहे. अभियानाची अंमलबजावणी, नियोजन आणि विविध स्तरांवरील जबाबदाऱ्या याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

यावेळी श्री.आबीटकर यांच्या हस्ते ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियान संदर्भात माहिती पुस्तिकेचे तसेच गीताचे अनावरण करण्यात आले. तसेच अभियानाच्या जनजागृतीकरिता चित्ररथाचा फित कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यशाळेत अभियान अंमलबजावणीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत संबंधित जिल्हा प्रतिनिधींनी माहिती दिली.

या कार्यशाळेत पुणे विभागातील सर्व परिमंडळातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते. तसेच  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button