विधानसभा निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले..

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीर व हरियाणा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार? याविषयी अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार दिलीप लांडे यांनी आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी दिलीप लांडे यांना आगामी निवडणुकांमध्ये विजयी करण्याचे आवाहन केले. तेव्हा त्यांनी निवडणुकांच्या तारखांचं संदर्भ दिला. आता दोन महिन्यांत निवडणुका आहेत ना? नोव्हेंबरमध्ये. तेव्हा आपण सगळ्यांनी प्रचंड मताधिक्याने दिलीप लांडेंच्या मागे उभं राहायचं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – Political Suspense: चिंचवडमध्ये नाना काटेंच्या हाती ‘‘तुतारी’’ : शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा पत्ता कट?
कुणी कितीही आकांडतांडव केलं तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ते म्हणतात दीड हजार रुपयांत काय होणार? तुम्ही काय त्यांना भीक देताय का म्हणे. बोलायला लाज तरी वाटली पाहिजे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले, पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार? पण दीड हजार रुपयांची किंमत माझ्या माता-भगिनींना आणि मला माहिती आहे. मी दीड हजारावर थांबणार नाही. तुम्ही सरकारचं बळ वाढवलं तर दीड हजाराचे दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील, तीन हजाराच्या पुढेही आम्ही जाऊ. कारण हे देणारं सरकार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.





