वीकेंडला घरबसल्या मनोरंजनाचा धमाका! सनी देओलच्या ‘इक्का’पासून राम चरणच्या ‘पेद्दी’पर्यंत; या आठवड्यात ओटीटीवर आलेले ७ नवे चित्रपट

जर तुम्ही या वीकेंडला घरी बसून काहीतरी धमाकेदार पाहण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्स, सोनीलिव्ह, झी५ आणि जिओ हॉटस्टारवर अनेक जबरदस्त चित्रपट आणि सीरिज रिलीज झाल्या आहेत. साऊथ सिनेमाच्या चाहत्यांपासून ते बॉलिवूडप्रेमींपर्यंत सर्वांसाठीच हा वीकेंड मजेदार असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या आठवड्यात ओटीटीवर भेटीस आलेल्या चित्रपटांची यादी:
पेद्दी (नेटफ्लिक्स)
या आठवड्यातील सर्वात मोठा आणि बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा ‘पेद्दी’ होय. हा चित्रपट ९ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सध्या हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध असून, हिंदी भाषेत तो नंतर रिलीज होणार आहे.
इक्का (नेटफ्लिक्स)
सनी देओल आणि अक्षय खन्ना स्टारर ‘इक्का’ हा कोर्टरूम ड्रामा १० जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे, ‘बॉर्डर’ चित्रपटानंतर सनी देओल आणि अक्षय खन्ना हे दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर आले आहेत. हा उत्कंठावर्धक चित्रपट तुम्ही वीकेंडला पाहू शकता.
पती पत्नी और वो दो (नेटफ्लिक्स)
हा चित्रपट २०१९ मध्ये आलेल्या हिट चित्रपट ‘पती पत्नी और वो’चा सीक्वेल आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना ‘प्रजापती पांडे’च्या भूमिकेत दिसत आहे, तर त्याच्या पत्नीची भूमिका वामिका गब्बीने साकारली आहे. हा चित्रपट १० जुलैपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.
हेही वाचा
सिंग गीतम (नेटफ्लिक्स)
९४ वर्षांचे दिग्गज चित्रपट निर्माते सिंगीतम श्रीनिवास राव यांचा ‘सिंग गीतम’ हा एक अप्रतिम म्युझिकल चित्रपट आहे. ‘कुबेरापुरम’ नावाच्या काल्पनिक गावावर आधारित असलेल्या या सिनेमात गावातील तरुणांची स्वप्ने, नातेसंबंध आणि कलाकारांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
बाल्टी (सोनीलिव्ह)
उन्नी शिवलिंगम यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘बाल्टी’ हा एक मल्याळम ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. २०२५ मध्ये चित्रपटगृहांमध्ये यशस्वी ठरलेला हा सिनेमा आता १० जुलैपासून सोनीलिव्हवर आला आहे. केरळ-तामिळनाडू बॉर्डरवर आधारित या कथेत उदयन उर्फ ‘बाल्टी’ नावाच्या एका कबड्डीपटूचा गुन्हेगारी जगतातील प्रवास दाखवला आहे.
परिमाला एंड कंपनी (झी५)
जर तुम्हाला डार्क कॉमेडी आणि थ्रिलर पाहायला आवडत असेल, तर ‘परिमाला अँड कंपनी’ हा एक उत्तम पर्याय आहे. हा एक क्राईम-कॉमेडी चित्रपट असून यात एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे. एका स्थानिक गुंडाच्या खुनानंतर या कुटुंबाच्या शांत आयुष्यात कशी खळबळ उडते, यावर हा रंजक चित्रपट बेतला आहे. हा चित्रपट झी५ वर पाहता येईल.
लँड ऑफ फुटबॉल (जिओ हॉटस्टार)
खेळप्रेमींसाठी जिओ हॉटस्टारवर १० जुलै रोजी ‘लँड ऑफ फुटबॉल’ ही स्पोर्ट्स डॉक्युमेंट्री रिलीज झाली आहे. ही एक मल्याळम डॉक्युमेंट्री असून यामध्ये केरळ आणि फुटबॉल खेळाचे घट्ट नाते आणि तिथली फुटबॉल संस्कृती दाखवण्यात आली आहे. कोणत्याही विशिष्ट खेळाडूवर आधारित नसलेली ही डॉक्युमेंट्री अशा समुदायाची कथा सांगते ज्यांच्यासाठी फुटबॉल हा केवळ खेळ नसून एक भावना आहे.





