दिल्लीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत हे एकाच व्यासपीठावर
शरद पवार हे आमचे विरोधकही नाहीत आणि शत्रू तर अजिबात नाहीत ते मार्गदर्शक आहेत

दिल्ली : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी बोलताना शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर त्यावेळी जोरदार हल्लाबोल केला होता. ‘शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला पण विश्वासघात झाल्यासारखी परिस्थिती आहे’, असं राऊत यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
दरम्यान त्यानंतर आता एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं दिल्लीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत हे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार हे आमचे विरोधकही नाहीत आणि शत्रू तर अजिबात नाहीत ते मार्गदर्शक आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील लघु उद्योजकांना लोकप्रतिनिधी- प्रशासनाचा ‘विश्वास’
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. ते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. ‘महाराष्ट्र सदन हे दिल्लीमध्ये मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं स्थान असलेली जागा आहे, आणि इथे हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला माननीय पवार साहेब उपस्थित आहेत. पवार साहेबांसोबत मी देखील आहे, माननीय पवार साहेब हे आमचे विरोधकही नाहीत आणि शत्रू तर अजिबात नाहीत. ते महाराष्ट्राचे, देशाचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, आणि ते राहातील. मी अनेक वर्ष लिहितो आहे, रोज लिहितो आहे. कुठेही असो तरी लिहितो. विमानात लिहितो, कारमध्ये असलो तरी लिहितो. पुस्तक लिहीनं सोपं नाही. मी तुरुंगातून सुटल्यानंतर मला पुस्तक लिहायचं होतं. तीन वर्ष झाली अजून पुस्तक लिहितो आहे, पण पुस्तक लिहिनं सोपी गोष्ट नाही, असं यावेळी संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.