दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवालांसह सिसोदियांची निर्दोष मुक्तता

Arvind Kejriwal | दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राऊज एव्हेन्यू न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता करत महत्त्वाचा निकाल दिला. या निर्णयानंतर आम आदमी पक्षासाठी मोठा राजकीय दिलासा मानला जात आहे.
निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी भावनिक प्रतिक्रिया देत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सत्याचा विजय झाला. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सर्वात मोठा राजकीय कट रचला, आम आदमी पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकले. भारतातच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यात आले. सिसोदियांना दोन वर्षे तुरुंगात ठेवले. केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत असा आरोप करण्यात, पण मी भ्रष्टाचारी नाही, असे म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा : अफगाणिस्तान–पाकिस्तान संघर्ष भडकला; हवाई हल्ल्यांनंतर ‘उघड युद्ध’ची घोषणा
केजरीवाल भ्रष्ट आहेत म्हणत आमच्यावर टीका करण्यात आली. पण, केजरीवाल भ्रष्टाचारी नाही. सिसोदिया भ्रष्टाचारी नाही. माझ्यावर खोटी केस करण्यात आली. सत्तेसाठी देश आणि संविधानासोबत असा व्यवहार करु नका. खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा चांगली कामं करुन सत्तेत या, असे केजरीवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
२०२२ मध्ये दिल्ली मद्य धोरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयकडून याबाबत विविध पुरवणी आरोपपत्रही दाखल केली होती. अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची नावे आरोपपत्रात नमूद करण्यात आली होती.




