महापालिका क्रीडा विभागाला अखेर जाग : युमनानगर येथील जलतरण तलावाची दुरूस्ती सुरू!
भाजपाचे नगरसेवक उत्तमराव केंदळे यांचा पाठपुरावा : परिसरातील नागरिकांना मिळाला दिलासा

पिंपरी-चिंचवड | यमुनानगर येथील कै. सौ. माँसाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलाव येथील अस्वच्छता व गैरव्यवस्थापनाच्या तक्रारींनंतर अखेर प्रशासनाने दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. नगरसेवक उत्तमराव केंदळे यांनी केलेल्या तीव्र पाठपुराव्यानंतर क्रीडा विभागाला हालचाल करावी लागल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तलावातील तुटलेल्या फरशा, खोलींची दुरावस्ता यासह फिल्ट्रेशन यंत्रणेतील बिघाड आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे जलतरणपटू व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. सकाळ-संध्याकाळ सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वारंवार बंद दरवाज्याला सामोरे जावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर केंदळे यांनी प्रशासनाला जाब विचारत तलाव तातडीने सुरक्षित व पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली होती. “करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सुविधा खेळाडूंनाच उपलब्ध नसतील, तर ते प्रशासनाचे अपयश आहे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
हेही वाचा : अफगाणिस्तान–पाकिस्तान संघर्ष भडकला; हवाई हल्ल्यांनंतर ‘उघड युद्ध’ची घोषणा
दरम्यान, प्रशासनाने तलाव परिसराची स्वच्छता मोहीम सुरू केली असून तुटलेल्या फरसबंदीची दुरुस्ती, बदलाखोल्यांचे नुतनीकरण, तसेच फिल्ट्रेशन यंत्रणेची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पालिकेने शहरात १३ जलतरण तलाव उभारल्याचा दावा केला असला, तरी काही तलाव दीर्घकाळ बंद असल्याबाबत टीका होत आहे. त्यामुळे यमुनानगर येथील तलावाचे काम जलदगतीने पूर्ण करून नियमित सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा जलतरणपटूंकडून व्यक्त होत आहे. आता प्रशासनाने सुरू केलेली दुरुस्ती ही तात्पुरती उपाययोजना न ठरता कायमस्वरूपी सुधारणा ठरावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. क्रीडा विकासाचे दावे करणाऱ्या महापालिकेने प्रत्यक्ष कृतीतून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
यमुनानगर येथील कै. सौ. माँसाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलावाबाबत नागरिक आणि जलतरणपटूंनी व्यक्त केलेल्या तक्रारी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या होत्या. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या या सुविधांची अशी दुरवस्था होणे अस्वीकार्य आहे. माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत, ही सकारात्मक बाब आहे; मात्र ही कामे केवळ वरवरची न राहता दर्जेदार व कायमस्वरूपी व्हावीत, यासाठी मी लक्ष ठेवून आहे. पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. तलाव लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा.
– प्रा. उत्तमराव केंदळे, नगरसेवक, भाजपा. यमुनानगर.




