अफगाणिस्तान–पाकिस्तान संघर्ष भडकला; हवाई हल्ल्यांनंतर ‘उघड युद्ध’ची घोषणा

Pakistan -Taliban Afghanistan War | अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून सीमावर्ती भागातील चकमकीनंतर पाकिस्तानने काबूल आणि कंदाहारवर हवाई हल्ले केल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने अफगाणिस्तानात प्राणघातक हवाई कारवाई केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाण तालिबान सरकारने पाकिस्तानवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी “आमचा संयम संपला असून उघड युद्ध सुरू झाले आहे” असे जाहीर केले.
कतारची मध्यस्थी निष्फळ
दोन्ही देशांतील वाढता तणाव लक्षात घेता कतारने मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही बाजूंनी एकमेकांचे डझनभर सैनिक ठार केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, आसिफ यांनी एक्सवर पोस्ट करत “आमचा संयम संपला आहे. आमच्यात आणि तुमच्यात उघड युद्ध सुरू झाले आहे,” असा इशारा दिला.
हेही वाचा : केरळनंतर आता ‘या’ शहराचे नाव बदलणार? थेट अमित शहांकडे केली मागणी
अफगाणिस्तानचा दावा
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानने कंदाहारसह आग्नेयेकडील पक्तिया प्रांतात हवाई हल्ले केल्याचे सांगितले. काबूलमध्ये किमान तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले, मात्र नेमके ठिकाण आणि जीवितहानीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी सीमेजवळील पाकिस्तानी हवाई हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री अफगाण सैन्याने प्रत्युत्तरात्मक हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
आसिफ यांचे आरोप
ख्वाजा आसिफ यांनी नाटो सैन्य माघारीनंतर अफगाणिस्तानात स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती, मात्र तालिबानने पाकिस्तानविरोधी कारवाया सुरू ठेवल्याचा आरोप केला. “तालिबान पाकिस्तानला लक्ष्य करत आहे. आमची सशस्त्र सेना निर्णायक प्रत्युत्तर देत आहे. आता संयमाची मर्यादा संपली आहे. हा उघड संघर्ष आहे,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.




