‘अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील’; मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया

पुणे | राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना झाला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं. मात्र, महायुतीमधील काही नेत्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यामुळे काही नेते नाराज असल्याची चर्चा अद्यापही सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. यावरून दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया देत आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, त्यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं आहे.
दत्तात्रय भरणे म्हणाले, की मी बाहेर (परदेशात) होतो. आता पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहे, मी नाराज नाही. मी १० वर्ष परदेशात गेलो नव्हतो. आता कुठे गेलो तर लगेच नाराजीच्या चर्चा रंगल्या. या नाराजीच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या प्रकारे राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत.
हेही वाचा – गृहनिर्माण संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकींना अखेर नवीन वर्षाचा मुहुर्त !
पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात काहीही रस्सीखेच नाही. सर्व तुमच्या मनासारखं होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य तो निर्णय घेतील. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणी काहीही म्हणू द्या, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्य दिनानिमित्त मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं. यानंतर ते म्हणाले, कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्य दिनानिमित्त प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. याचा आढावा देखील घेतला आहे. वाहतुकीच्या नियोजनापासून ते विजयस्तंभाला अभिवादन करण्यापर्यंत चांगल्या प्रकारे व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली. तसेच आपण अजूनही कुठे कमी पडतोय का? हे पाहून भविष्यात अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच भविष्यात आर्थिक मदत देण्याचा प्रयत्नही असेल, असंही दत्तात्रय भरणे म्हणाले.





