महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत
2 की 3 मार्च… कधी आहे विनायक चतुर्थी?

मुंबई : प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत केले जाते. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न केल्यामुळे त्यांचा आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. विनायक चतुर्थीचा दिवस कोणत्याही शुभकार्यासाठी चांगला मानला जातो. या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे तुम्हाला आशिर्वाद मिळतो आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते. धार्मिक मान्यतेनुसार, विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच घरातील आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
हिंदू कॅलेंडरनुसार, विनायक चतुर्थी, म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी, 2 मार्च रोजी रात्री 9:01 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:02 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, यावेळी विनायक चतुर्थीचे व्रत सोमवार, 3 मार्च रोजी पाळले जाईल. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वास्तूदोष असतील किंवा नकारात्मक उर्जा वाटत असेल तर तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी करू शकता.
हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !
पंचांगानुसार, विनायक चतुर्थीला बाप्पाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 3 मार्च रोजी सकाळी 11:23 ते दुपारी 1:43 पर्यंत असेल. धार्मिक श्रद्धेनुसार, शुभ काळात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा करण्यासाठी, व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे आणि नंतर उपवास करण्याचे व्रत घ्यावे. , त्यानंतर घरातील मंदिरात गंगाजलने गणपतीला स्नान घाला. त्यानंतर पंचामृताने गणपतीला स्नान घाला आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घाला. गणपतीला चंदन, रोली, कुंकू आणि फुलांनी सजवा. नंतर त्यांना लाडू आणि मोदक द्या. त्यानंतर भगवान गणेशाचे विविध मंत्र जप करा जसे की, “ओम गं गणपतये नमः आणि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देवा सर्वकार्यशु सर्वदा”. यानंतर, व्रतकथा पठण करून आणि गणपतीची आरती करून पूजा पूर्ण करा.
विनायक चतुर्थीला ‘या’ गोष्टी करू नका…..
विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये. असे केल्यास जीवनामध्ये नकारात्मक मानले जाते.
विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका.
विनायक चतुर्थीला नकारात्मक विचारांपासून दूर राहाणे फायदेशीर ठरेल.
विनायक चतुर्थीला मांस, मद्य इत्यादी तामसिक अन्न सेवन करू नका.
विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये