‘अजित पवारांनी कधी सावरकरांचा विरोध केला नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Devendra Fadnavis | राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने असल्याने प्रचारात चुरस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी अजित पवारांवर टीका करत, अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, असे विधान केले. या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केले.
भाजपा नेते आशिष शेलार यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले, मला असं वाटतं की वीर सावरकरांच्या विचारांना अजित पवारांनी विरोध करण्याचं कारण नाही आणि त्यांनी कधी सावरकरांच्या विचारांना विरोध केला नाही. आजपर्यंत तरी त्यांनी विरोध केल्याचं मी पाहिलं नाही. मात्र, आमची भूमिका पक्की आहे की, वीर सावरकरांच्या विचारांना विरोध आम्हाला मान्य नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : नागपूर – चंद्रपूर प्रवास लवकरच दोन तासांत; सुधारित संरेखनानुसार पर्यावरणीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर
आमचे रवींद्र चव्हाण हे म्हणाले आहेत की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरांच्या विचारांवर चालणारे लोक आम्ही आहोत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला (राष्ट्रवादीला) देखील सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आमचे विचार असे आहेत की तुम्ही याल तर आम्ही तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्याशिवाय. विरोधात गेलात तर तुमच्या विरोधात. आम्ही आमचं काम करू, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.




