Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर – चंद्रपूर प्रवास लवकरच दोन तासांत; सुधारित संरेखनानुसार पर्यावरणीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर

मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. या महामार्गाचे संरेखन बदलण्यात आले असून नवीन संरेखनाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आता एमएसआरडीसीने नवीन संरेखनानुसार पर्यावरणीय मान्यतेसाठी नुकताच प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नागपूर – चंद्रपूर अंतर केवळ दोन तासांत पार करता येणार आहे.

मुंबई – नागपूर प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधून सेवेत दाखल केला. या महामार्गाचा विस्तार करण्यासाठी नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदीया, भंडारा – गडचिरोली आणि जालना – नांदेड असे महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर – चंद्रपूर महामार्गाच्या सहा टप्प्यातील कामासाठी एमएसआरडीसीने निविदा मागविल्या होत्या, या निविदांना चांगला प्रतिसादही मिळाला होता.

हेही वाचा –  “महिला मतदारांची भूमिका निर्णायक..”; डाॅ. नीलम गोऱ्हे

मात्र या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण नसताना निविदा काढण्यात आल्या. परिणामी या निविदा बाद ठरवून त्या रद्द करण्यात आल्या. या प्रकल्पासाठी नव्याने निविदा मागविल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे या महामार्गाला पर्यावरण मान्यताही मिळालेली असताना या प्रकल्पात मोठ्या संख्येने वन क्षेत्र बाधित होत असल्याने त्यात काही बदल करून वन क्षेत्र वाचवता येईल का याचा विचार करत संरेखनामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नव्याने पर्यावरणीय परवानगी घ्यावी लागली आहे. या निर्णयानुसार एमएसआरडीसीने नागपूर – चंद्रपूर महामार्गाचे नवीन संरेखन तयार केले आहे. या चार पदरी आणि २०४ किमीच्या महामार्गाच्या सुधारित संरेखनाला काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मान्यता दिली.

राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी एमएसआरडीसीने नवीन संरेखनानुसार नवीन प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे पाठविल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. नवीन सुधारित संरेखनानुसार बाधित वन क्षेत्रापैकी २७ हेक्टर वन क्षेत्र बाधित होण्यापासून वाचवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. हे महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, या प्रकल्पाला एकीकडे पर्यावरणीय मान्यता घेण्याची, तर दुसरीकडे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून महामार्गाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. नागपूर – चंद्रपूर प्रवासासाठी आजघडीला तीन – साडे तीन तास लागतात. पण हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास हे अंतर केवळ दोन तासात पार करता येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button