Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रावेतमधील फर्निचर मॉलवरील गोळीबार लॉरेन्स बिष्णोई गँगकडून? मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा…

पिंपरी-चिंचवड | रावेत परिसरातील पुनावळे येथील फर्निचर मॉलच्या मालकावर मे महिन्यात दोन अज्ञातांनी केलेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने समाजमाध्यमावर पोस्ट करित स्वीकारली आहे. याप्रकरणी १२ आरोपींची नावे निष्पन्न झाली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुनावळेतील गोळीबाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, बापूसाहेब पठारे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, नाना पटोले, नितीन राऊत, अमिन पटेल, विश्वजित कदम, समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. फर्निचर मॉलच्या मालकावर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबाराची लॉरेन्स बिष्णोई गँगने समाजमाध्यमावर पोस्ट करित जबाबदारी स्वीकारल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का, खंडणीची रक्कम न मिळाल्याने गोळीबार करण्यात आला होता. मागील महिन्याभराच्या काळात अशाप्रकारे इतर दोन व्यापाऱ्यांना देखील खंडणी मागण्यात आली आहे का, गोळीबाराच्या घटनांमुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली असे विविध प्रश्न विचारले होते.

त्याला गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. रावेत परिसरातील पुनावळे येथील फर्निचर मॉलच्या मालकावर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबाराची लॉरेन्स बिष्णोई गँगने समाजमाध्यमावर पोस्ट करित जबाबदारी स्वीकारली आहे. हा गोळीबार आणि खंडणी मागितल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुनावळे गोळीबार प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून १२ आरोपी निष्पन्न झाले आहेत. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा पथकाद्वारे शोध सुरु आहे. अटक आरोपींकडून दोन पिस्तूल, राऊंड, इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इतर दोन व्यापाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी संत तुकारामनगर, दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

हेही वाचा

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

खंडणी मागितलेल्या व्यापाऱ्यांना योग्य ते पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहे. व्यापारी व नागरिक यांच्या संयुक्त बैठका आयोजित करण्यात येत आहेत. साध्या वेशातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नेमका काय झाला होता प्रकार?

दाेन काेटी रूपयांची खंडणी न दिल्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पुनावळेतील एका नामांकित फर्निचर मॉलवर अंदाधुंद गोळीबार केला. सहा गोळ्या झाडल्या. ही घटना १६ मे रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली होती. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. खंडणीसाठी गोळीबार करण्याची सुपारी सिद्धू मुसावाला हत्या प्रकरणातील आरोपीने तुरूंगातून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. चंदिगढ येथे तिघांना पिस्तूल आणि २३ काडतुसे देण्यात आली होती. सोनीपत येथे त्यांचा गोळीबार करण्याचा सराव झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

परविन रामनिवास (२२), पंकज कुलदीप (२१), सागर अजयपाल (२१, सर्व रा. हरियाणा) यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने हरिद्वार येथून अटक केली. बिश्नोई टोळी विरुद्ध खून, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. आरजू बिश्नोई याने आरोपींना दोन पिस्तूल, २३ काडतुसे हस्तकामार्फत पुरवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यासाठी आरोपींना अडीच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. त्यातील ५० हजार रुपये सागर अजयपाल याच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button