छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ; नेमकी कोणत्या खात्याची जबाबदारी मिळणार?

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली असून, त्यांनी आज सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली.
भुजबळांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने ओबीसी समाज आणि समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध आरोपांना सामोरे जावे लागल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हाच भुजबळांना पुन्हा मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
हेही वाचा : राहुल गांधींचा जयशंकरांवर पुन्हा हल्ला : “त्यांचे मौन लज्जास्पद”; भाजप म्हणते – हे पाकिस्तानची भाषा
अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. आता हेच खाते पुन्हा एकदा छगन भुजबळांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छगन भुजबळ यांनी आतापर्यंत नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत सरकारमध्ये यशस्वीपणे काम केलं आहे.