काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत, पुणे शहराध्यक्षांवर गंभीर आरोप

Sangeeta Tiwari | पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून, काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पक्षनेतृत्व आणि पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्या म्हणाल्या की, पुण्यातील महिला काँग्रेस कार्यालय बंद केल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घेतली नाही. याशिवाय, ब्राह्मण असल्याने त्यांना पक्षात त्रास दिला गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षात नवीन चेहरे आणि त्यांचे नातेवाईक यांचा प्रभाव वाढला असून, जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. मी पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे, पण माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खटला दाखल करण्याचा कट रचला गेला. याबाबत मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शंभर ई-मेलद्वारे तक्रार केली, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी पुढे सांगितले की, येत्या आठ दिवसांत त्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत निर्णय घेतील.
हेही वाचा : छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ; नेमकी कोणत्या खात्याची जबाबदारी मिळणार?
काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण नाही. जुन्या कार्यकर्त्यांना घरी बसवले जात आहे, तर नवखे लोक आणि त्यांचे नातेवाईक पक्षात प्रभावी ठिकाणी बसवले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. पुणे काँग्रेसमधील हे अंतर्गत मतभेद पक्षासाठी डोकेदुखी ठरत असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.