“राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चौंडीत येतील”, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Devendra Fadnavis : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने आज अहिल्यानगरमधील चौंडीत भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती राम शिंदे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
“अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असताना घेतला. खरं म्हणजे राम शिंदे आणि आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. यासाठी मी जेव्हा पंतप्रधान मोदी यांना भेटलो आणि सांगितलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की माझ्यासमोर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दुसरीकडे कर्मस्थळ. मोदींनी सांगितलं की यावेळी मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजधानीत कर्मस्थळावर सभा घेण्याचं ठरवलं आहे. मात्र, पुढच्यावेळी जन्मस्थळावर नक्की येईल. असा निश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – विशेष अधिवेशनाच्या मागणीवर विरोधक ठाम; राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पाठवणार पत्र
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मध्य प्रदेशात देखील मोठा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. आम्ही आजच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला थोडा उशीर झाला होता. मात्र, तरीही मला विश्वास आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी लवकरच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.