‘पीएम किसान’चे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक, तर ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी लाभार्थी; महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना लाभ?

अकोला : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची रक्कम शनिवारी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील ९० लाख ८६ हजार ८३५ शेतकऱ्यांना १८१७.९० कोटी रुपयांचे वाटप केले जाईल. सर्वाधिक लाभार्थी शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील असून ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे.
केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना २०१९ पासून सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जातात. पीएम किसानची रक्कम डीबीटी मार्फत पाठवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची रक्कम जारी करणार आहेत. शेतकऱ्यांना या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळतील.
पीएम किसान योजनाचे राज्यात सर्वाधिक पाच लाख ४५ हजार ४८१ लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. त्यांना १०९.३२ कोटींचे वितरण होईल. सर्वात कमी लाभार्थी संख्या ठाणे जिल्ह्यातील असून याठिकाणी ७२ हजार २९७ शेतकऱ्यांना १४.४७ कोटी रुपये वितरीत होतील. इतर जिल्ह्यातील संख्या खालील प्रमाणे आहे.
हेही वाचा – सन २०२६ ची महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार? एमपीएससीने दिली महत्त्वाची माहिती…
ई-केवायसी करणे आवश्यक
पीएम किसानच्या २३ व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे. पीएम किसानच्या पोर्टलवर ओटीपी आधारित ई-केवायसी सुविधा सुरु आहे. सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी करुन घेता येते. ई केवायसी करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.





