समुद्र प्रदक्षिणा या सागरी परिक्रमा मोहिमेला सुरुवात; तीन सैन्य दलांतील महिलांचा सहभाग

मुंबई : तीन सैन्य दलांतील महिलांच्या ‘समुद्र प्रदक्षिणा’ या मुंबई ते सेशेल्स आणि पुन्हा मूळ ठिकाणी परत अशा सागरी परिक्रमा मोहिमेचा आज प्रारंभ झाला. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांनी मुंबईत कुलाबा इथल्या भारतीय नौदल जलक्रीडा प्रशिक्षण केंद्रातून या मोहीमेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या मोहिमेत भारतीय सैन्य दल, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलातल्या १२ महिला सदस्यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत आयएएसव्ही त्रिवेणी जहाज मुंबई ते सेशेल्स आणि पुन्हा मुंबईला परत असा ४ हजार सागरी मैलांचा 55 दिवसांचा आव्हानात्मक प्रवास करणार आहे.
ही एक पथदर्शी मोहिम असून सागरी उपक्रमांमध्ये लिंगभाव समानतेला चालना देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. २०२६ या वर्षासाठीही अशाच प्रकारच्या महत्त्वाकांक्षी सागरी परिक्रमा मोहिमांचे नियोजन केले असून, त्या दिशेनेच ही मोहीम पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आखण्यात आली आहे. या मोहिमेसाठी तीन्ही सैन्यदलांतील ४१ उत्साही महिला प्रतिनिधींमधून १२ महिला अधिकार्यांची निवड केली गेली. या सर्व जणींनी सागरी जलपर्यटनाचे दोन वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.
हेही वाचा – बारामतीत ‘वायुवेग’ पथकाकडून नऊ हजार चालकांवर कारवाई
या सर्व महिला अधिकारी, समुद्रातील धोकादायक जलप्रवास करून त्यांच्यातील धैर्य आणि निर्धाराने दर्शन घडवतील. या चमूने हवामानाशी संबंधित आव्हाने, जहाजातील यांत्रिक समस्या आणि शारीरिक आव्हानांसारख्या अनेक प्रशिक्षण मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. मुंबई-सेशेल्स-मुंबई या मोहिमेच्या माध्यमातून सशस्त्र दलातील महिलांच्या सक्षमीकरणाची प्रचिती येईल, आणि त्यासोबतच ही मोहीम अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार्या राणी वेलू नचियार, राणी दुर्गावती आणि राणी लक्ष्मीबाई यांसारख्या भारताच्या महान वीरांगनाना आदरांजलीही अर्पण करणारी मोहीम असणार आहे. दिनांक ३० मे २०२५ रोजी या अभूतपूर्व मोहिमेची सांगता होईल.