सन २०२६ ची महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार? एमपीएससीने दिली महत्त्वाची माहिती…

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) सन २०२६ ची महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहेत. या परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन एमपीएससीतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दक्षता, धोरण व संशोधन विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉरमेशन (मित्रा) या संस्थेकडून तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीकडुन सुरु असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करून त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच सन २०२६ ची महाराष्ट्र गट-क सेवेच्या पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा – दाभाडे सरकार चौकातील चार दिवसांचा अंधार संपला!
‘आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरुपाची असते. एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते. त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधीही देण्यात येतो,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सन २०२६ ची महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहेत. या परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील लाखो उमेदवार एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. राज्यसेवेसह विविध परीक्षांच्या जाहिरातीकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले असते. अलीकडेच राज्यसेवेच्या पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गट क सेवेसाठी किती पदांची जाहिरात येणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. एमपीएससीने अभ्यासक्रम, गट क सेवा परीक्षेबाबत दिलेल्या स्पष्टीकरणामुळे समाजमाध्यमांत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.





