#bulldozer। नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहिम खानच्या घरावर बुलडोझर!

Nagpur Violence | नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड आणि मुख्य आरोपी फहिम खानच्या घरावर आज नागपूर महानगरपालिकेने मोठी कारवाई करत बुलडोझर चालवला. नागपूरच्या टेकानाका परिसरातील हे घर अनधिकृतपणे बांधण्यात आले होते. महापालिकेने २१ मार्च रोजी नोटीस बजावल्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून प्रत्यक्ष तोडकाम सुरू झाले.
बेकायदा बांधकाम म्हणून कारवाई
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी २० मार्च रोजी घराची पाहणी करून हे बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सांगितले होते. या घराचा कोणताही अधिकृत बांधकाम परवाना नसल्याने तो अनधिकृत ठरवण्यात आला. घराचे मालकी हक्क फहिम खानच्या आईच्या नावावर होते, मात्र ते EWS अंतर्गत ३० वर्षांच्या लीजवर देण्यात आले होते.
हेही वाचा : ‘कुणाल कामराने माफी मागावी अन्यथा..’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
दंगेखोरांवर कठोर कारवाई
महापालिकेने फहिम खानच्या कुटुंबाला आधीच नोटीस बजावल्याने त्यांनी रात्रीच घर रिकामे केले होते. आज झालेल्या कारवाईदरम्यान यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. स्थानिक पोलिसांसह SRPF च्या दोन तुकड्यांची तैनाती करण्यात आली होती.
याशिवाय, पोलिसांनी शनिवारी फहिम खानच्या अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) शी संबंधित दोन दुकानेही सील केली होती. या कठोर कारवाईतून सरकारने दंगेखोरांना कडक संदेश दिला आहे.