मोठी बातमी: प्रस्तावित ‘‘शिवनेरी’’ जिल्हाच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार- आमदार महेश लांडगे आमने-सामने!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच वादाची ठिणगी : जिल्हा विभाजन होणार नाही: अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लांडगे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय रस्सीखेच पुन्हा एकदा समोर आली. राज्यात जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव आहे, तसे असेल तर पुणे जिल्ह्यातून नवीन निर्माण होणाऱ्या जिल्ह्याला ‘‘शिवनेरी’’ नाव द्यावे, अशी जाहीर मागणी महेश लांडगे यांनी केली. यावर अजित पवार यांनी अशाप्रकारे जिल्हा विभाजन होणार नाही. बातम्यांवर विश्वास ठेवू नका, अशी स्पष्टोक्ती केली. त्यामुळे ‘शिवनेरी’ जिल्ह्याच्या निमित्ताने अजित पवार- महेश लांडगे आमने-सामने आलेले पहायला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन चिखली येथील प्रस्तावित जागेत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, गृहराज्य मंत्री योगेश कदम महायुतीचे आमदार उपस्थित होते.
… यामुळे वादाची ठिणगी!
आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवनेरी जिल्हा तयार करण्याची जाहीर मागणी केली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री पवारांचा जिल्हा विभाजनाला स्पष्ट नकार दिला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी शहरभर ‘ब्रँडिंग’ केले आणि भाजपाला श्रेय घेतले. यावरुन वादाची ठिणगी पडली. कारण, महेश लांडगे यांनी शहरात भाजपाची जाहीरातबाजी केली. होर्डिंग आणि प्रसारमाध्यमांध्ये जाहीराती प्रसिद्ध झाल्या. या जाहिरातींमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींचे फोटो झळकले. महायुतीचे सरकार असताना आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाहिरातींमध्ये दिसला नाही. ही बाब अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सकाळीपासूनच अजितदादांचा पारा चढला होता, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
हेही वाचा: राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत; खा. उदयनराजे भोसले
काय म्हणाले महेश लांडगे ?
1. पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार असेल, तर शिवनेरी जिल्हा करा.
2. पिंपरी-चिंचवडचा विकास 2014 नंतर महायुतीच्या काळात झाला.
3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पिंपरी-चिंचवड प्रगतीपथावर
काय म्हणाले अजित पवार ?
1. जिल्ह्यांचे विभाजन होणार, अशा बातम्यांमध्ये तथ्य नाही. जिल्हा विभाजन करणार नाही.
2. पिंपरी-चिंचवडचा विकास मीसुद्धा केला. महेश लांडगे नाव घ्यायला का विसरले माहिती नाही.
3. काम करणाऱ्यांना श्रेय द्या. कंजुसपणा करू नका, मीसुद्धा 1992 पासून पिंपरी-चिंचवडचा विकास केला.
अजित पवारांचा विरोध कशासाठी?
राज्यातील 35 जिल्ह्यांचे विभाजन करुन नवीन 22 जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. तसेच, 2026 मध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांची पुन:रचना प्रस्तावित आहे. लोकसंख्या वाढीनुसार, पुणे जिल्ह्याचे दोन मतदार संघ होणार आहे. त्यामुळे उत्तर पुणे आणि दक्षिण पुणे असे दोन मतदार संघ निर्माण होवू शकतात. अशातच पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन पुणे आणि ‘बारामती असे दोन जिल्हे निर्माण करावेत, असाही एक मतप्रवाह आहे. दरम्यान, उत्तर पुणे जिल्हात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान ‘‘शिवेनरी’’ असल्यामुळे नव्या जिल्ह्याला ‘‘शिवनेरी’’ नाव द्यावे, अशी मागणी शिव-शंभूप्रेमी आणि आमदार महेश लांडगे यांची आहे. परंतु, बारातमी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व अजित पवार करतात. त्यामुळे बारामतीचे वर्चस्व कमी होईल, या भावनेतून अजित पवार ‘‘शिवनेरी’’ जिल्ह्याला विरोध करीत आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
अजित पवारांचे नाव घेतले, पण दादा विसरले!
आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला दिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चढला. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली. त्यावेळी अजित पवार यांना खुला विरोध केला. याची सल अजित पवारांच्या मनात आहे. तसेच, शहराच्या विकासासाठी 1992 पासून 2017 पर्यंत योगदान दिले. पण, नामोल्लेख केला नाही. असा संकुचितपणा नको, असे खडेबोलही अजित पवारांनी सुनावले. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला होता. पण, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय आणि विकासकामांचे श्रेय मिळत नाही. याची खंत वाटत असल्यामुळेच महेश लांडगे यांना ‘टार्गेट’ केले, असे चित्र यानिमित्ताने पहायला मिळाले.