राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत; खा. उदयनराजे भोसले

UdayanRaje Bhosale | मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठं विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. यानंतर आता भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका व्यक्त केली असून सोलापूरकर यांच्याविरोधात घणाघाती टीका केली आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले, की जगाच्या पाठीवर एकमेव असा महापुरुष होऊन गेला, ज्यांनी ३५० वर्षांपूर्वी एक विचार दिला. भारतच नाही तर अनेक देश त्यांच्या विचारांचे अनुसरण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही. देशातील विविध जाती-धर्माच्या लोकांना आपले कुटुंब समजले. शिवरायांच्या विचारांमुळेच आपली गुलामगिरीतून मुक्तता झाली. त्यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. असे असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ विधाने केली जातात. राहुल सोलापूरकरने महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे सर्वच शिवभक्तांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार; चंद्रहार पाटलांचा मोठा निर्णय
राहुल सोलापूरकरसारख्या व्यक्तीची जीभ हासडली गेली पाहीजे. महापुरुषांबाबत जे अवमानकारक विधाने करतात त्यांना जनतेने वेचून ठेचले पाहीजे. महापुरुषांबाबत बोलणाऱ्या विकृतांमध्ये वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो. जाती-धर्मात जी तेढ निर्माण होते, ती अशाच विकृतांमुळे होत असते. या अगोदरही आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी केली होती की, अशी विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा कायद्यानुसार कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत, तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
विकृत विधाने करणाऱ्या व्यक्तीचे चित्रपट किंवा ते जिथे जिथे अभिनय करत असतील, ते ते हाणून पाडले पाहीजे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही अशा लोकांना थारा दिला नाही पाहीजे. या लोकांना गाडले गेले नाही तर देशाच्या अखंडतेसमोर धोका निर्माण होईल. मी तर म्हणतो अशा विकृतांना सरळ गोळ्याच झाडल्या पाहिजेत, असंही उदयनराजे भोसले म्हणाले.