विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंची आमदारकी अडचणीत?

पिंपरी | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. याची अधिकृत घोषणा विधानसभा अध्यक्षांकडून २६ मार्च रोजी करण्यात आली आहे. यातच आता आमदार अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर यांनी अण्णा बनसोडे यांच्य आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
अण्णा बनसोडे हे पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर यांचा पराभव केला आहे. याच सुलक्षणा शिलवंत-धर यांनी अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आमदार बनसोडे यांनी निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघण केल्याचा आरोप सुलक्षणा शिलवंत यांनी केला आहे. न्यायमुर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे.
हेही वाचा : Ajit Pawar | शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान
बनसोडे यांनी महापालिकेत तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. २०१४ च्या अपवाद वगळता पिंपरी मतदारसंघाच्या निर्मितीपासून ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. राजकारणात येण्यापूर्वी बनसोडे चिंचवड येथे पान टपरी चालवत होते.