त्या ३२ रसत्यांवरील कामे प्राधान्याने करा; अपर पोलीस आयुक्तांची महापालिकेला विनंती

पुणे : पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी २६५ किलो मीटरचे एकूण ३३ रस्ते निश्चीत करुन, या रस्त्यांच्या सुधारणांसाठी विविध उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. या मुख्य रस्त्यांवर शहरातील ८० टक्के वाहने प्रवास करत असतात. या वाहनांची संख्या जवळपास २० लाख आहे. मात्र या मुख्य रस्त्यांवरील कामाला महापालिका हवे तसे प्राधान्य देत नाही. यामुळे मुख्य रस्त्यांवरील कामाला प्राधान्य द्यावे अशी विनंती वाहतूक शाखेकडून महापालिकेला करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
पुणे शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी सर्वच स्तरावरुन करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती मनोज पाटील यांनी दिली. यावेळी उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे, सहायक आयुक्त नंदीनी वग्यानी, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक सुनील गवळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, मुख्य रस्त्यांवरील ट्रॅव्हल टाईम कमी करणे व रस्त्यांची कॅरिइंग कॅपीसीटी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये महापालिका आणि इतर शासकीय संस्थांच्या समन्वयाने ३३ मुख्य रस्ते निश्चीत करण्यात आले आहेत.
सप्टेंबर २०२४ पासून सुरु केलेल्या उपक्रमांमध्ये अभियांत्रीकी बदल, राईट, लेफ्ट आणि यु टर्न बंद करणे बॉटल नेक दूर करणे, विविध थांबे स्थलांतरीत करणे, चौक सुधारणा, पार्किग मॅनेजमेंट, वाहतूक नियमभंग कारवाई आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेमध्ये बदल, लक्झरी बसेस करीत ऑफ स्ट्रीट पार्किंग, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर विशेष मोहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली. या उपाय योजनांमुळे वाहतूकीचा वेग १०.४४ टक्क्यांनी वाढला असून, शहरातील मुख्य ठिकाणी होत असलेल्या वाहतुक कोंडीचे प्रमाण ५३ टक्के इतके कमी झाले आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – जायकासाठी आणखी १७९ कोटींचे अनुदान
मनोज पाटील यांनी सांगितले की, शहरात ३१० ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून वाहतूक कोंडी होत असते. यामध्ये ५० मुख्य रस्त्यांचा समावेश आहे. मात्र महापालिकेने ३१० पैकी केवळ ५० रस्त्यांचीच कामे केली आहेत. त्यात केवळ सहा मुख्य रस्ते आहेत. मुख्य ५० रस्त्यांची कामे केली असती तरी त्याचा लाखो वाहनचालकांना फायदा झाला असता. पालिकेने गल्ली बोळातील तसेच अंतर्गत रस्त्यावरील कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. त्याचा फायदा फक्त तेथील रहिवाशांनाच होणार आहे.
शहरात वाहतूक कोंडी होण्याच्या कारणांपैकी प्रमुख कारण सिग्नल यंत्रणा बंद पडणे हे आहे. वीज गेल्यास अनेकदा सिग्नल यंत्रणा बंद पडते. शहरात मुख्य चौकातील १७५ सिग्नलपैकी १६० सिग्नलला इनव्हर्टरच नाही. यामुळे वीज गेल्यास हाताने वाहतूक कोंडी सोडविण्यास मोठे कष्ट घ्यावे लागतात.
वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडीचा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी एटीएमएस, गुगल मॅप, कंट्रोल व समाजमाध्यमांकडून माहिती घेतली. तेव्हा लक्षात आले की वाहतूक नियमभंग, रस्त्यावरील खड्डे, रस्त्याचे काम सुरु असणे, वाहतूक फ्लो जास्त असणे, विविध उत्सव किंवा मिरवणूका, यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात आले. ही कोंडी टोळता येण्यासारखी होती. तर टाळता न येणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये वाहन बंद पडणे, अपघात, व्हीआयपी मुव्हमेंट, सिग्नल बंद पडणे आदी कारणांचा समावेश होता. शहरात सन २०२५ मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान ४२८ वेळा वाहतूक कोंडी झाली आहे. यात दोन रस्त्यावर ऑईल सांडल्याने आणि मनोरुग्ण महिला वाहनांवर दगड मारत असल्याने वाहन कोंडी झाली होती, असे पाटील यांनी सांगितले.