देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी, तर शंकर जगताप यांच्या मंत्रिपदासाठी तरुणाईने केली प्रार्थना

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील तरुणाईने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी तसेच शंकर जगताप यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी प्रार्थना केली. ही प्रार्थना शंकरवाडी येथील शिव मंदिरात विधीपूर्वक पूजा करून करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण नेते ठरले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे गतीमान झाली, विशेषतः मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांनी राज्याला नवीन उंचीवर नेले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि नागरी विकासावर भर दिला. शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावांना दुष्काळमुक्त करण्यात यश आले. तरुणांच्या अपेक्षांना प्रतिसाद देत त्यांनी नोकरीच्या संधी निर्माण करणे, कौशल्य विकासावर भर देणे आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन यावर लक्ष केंद्रित केले.
हेही वाचा – ‘गौतम अदाणींना अटक करा’; राहुल गांधींची मागणी
तसेच शंकर जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठीही तरुणांनी एकत्र येत प्रार्थना केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासात जगताप कुटुंबीयांचे मोठे योगदान राहिले आहे. या शहरातील पायाभूत सुविधा, औद्योगिक प्रगती आणि नागरी विकास यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे जगताप यांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून शहराचा आणखी वेगाने विकास होईल, अशी तरुणाईला अपेक्षा आहे.
या विधीवत पूजेला संभाजी शेंडगे, निखिल कोल्हे, प्रतीक वाघमारे, श्रेयस लोंढे, गणेश खोकले, यश देशपांडे, प्रज्वल पाथुर्डे, आयुष कांबळे, सक्षम देसाई, शिवम राऊत, प्रतीक मिर्गे यांच्यासह अनेक तरुण उपस्थित होते.




