महापालिकेसाठी नव्याने प्रभाग रचना? राज्य शासन, राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे : विधानसभेनंतर आता रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच पुणे महापालिकेची मार्च २०२२ मध्ये अंतिम करण्यात आलेली प्रभाग रचना मात्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळल्याने यापूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार महापालिकेचा एक प्रभाग कमी होणार असल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला पाठवला आहे. या अहवालामुळे आगामी निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना करावी लागण्याची शक्यता आहे. प्रभागांच्या रचनेत आणि आरक्षणात बदल होणार असल्याने प्रभाग रचना नव्याने करावी लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या अहवालात या गावातील किती लोकसंख्या कमी होते, त्याचा आरक्षणावर काय परिणाम होतो याची वस्तुस्थिती नमूद करण्यात आली. यापूर्वी केलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार या दोन गावांमध्ये तीन प्रभागांची निर्मिती करण्यात आली होती. त्यापैकी फुरसुंगी येथील एक प्रभाग कमी होत असल्याचे प्रशासनाने अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा – राज्यातील ‘या’ मतदारसंघामध्ये होणार फेर मतमोजणी; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
महापालिकेच्या यापूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी, फुरसुंगी आणि महंमदवाडी-उरुळी देवाची या तीन प्रभागांची निर्मिती करण्यात आली होती. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची या तीन प्रभागांमध्ये समावेश झाला होता. मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी आणि महंमदवाडी-उरुळी देवाची या प्रभागातील लोकसंख्या काही प्रमाणात कमी होते आहे. ही लोकसंख्या कमी झाली तरी तेथील आरक्षणावर कुठलाही परिणाम होत नसल्याचा अहवाल महापालिकेने पाठवला आहे.
महापालिकेने शासनाकडे मार्च २०२२ मध्ये पाठविलेली प्रभाग रचना तीन सदस्यांंच्या संख्येनुसार असून त्यात एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचा समावेश आहे. त्यानुसार ५८ प्रभागांची माहिती पाठविण्यात आली होती. त्यात आता एक प्रभाग कमी झाला आहे. तर त्यानंतर शासनाने महापालिकेने चार सदस्यांचा प्रभाग करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, ही नवीन प्रभाग रचना अद्याप महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे नेमकी कोणती प्रभाग रचना असणार याबाबतही संभ्रमाची स्थिती आहे.




