यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील बेकायदेशीर बांधकामावरून वाद
रुग्णांना मोठा त्रास, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : सचिन काळभोर

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर थेट पद्धतीने ठेकेदार नियुक्त करून सुरू केलेले बांधकाम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सदर ठिकाणी सुरु असलेल्या तोडफोडीच्या कामामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, रुग्णालयाच्या नियोजनात गोंधळ व बेफिकिरी दिसून येत आहे. या प्रकरणात आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांची भूमिका संशयास्पद असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्टनुसार इमारत सुरक्षित असूनदेखील ‘रेनोव्हेशन’च्या नावाखाली अनावश्यक खर्च व तोडफोड सुरू आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उधळपट्टी व मनमानी कारभाराचे द्योतक असल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे.
पाचव्या मजल्यावर एकूण तीन वेगवेगळ्या कक्षांमध्ये प्रत्येकी ४० रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजेच १२० रुग्णांसाठी या ठिकाणी सुसज्ज सोयी उपलब्ध होत्या. मात्र अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या बांधकामामुळे हे सर्व रुग्ण दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले आहेत. स्थानांतर प्रक्रियेत रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली असून, सध्या त्या ठिकाणी सुरू असलेली तोडफोड, ध्वनीप्रदूषण आणि अस्वच्छता यामुळे इतर विभागातील रुग्णही त्रस्त आहेत.
हेही वाचा – सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा धक्का; हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम
विशेष म्हणजे या बांधकामासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने एका ठेकेदाराला काम दिले गेले असून, उपठेकेदार मार्फत काम सुरू आहे. ‘नायडू’ नावाच्या ठेकेदाराकडून हे काम उपठेकेदारांना दिले गेले असल्याचे समजते. काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक, ठेकेदाराचे नाव, मोबाईल नंबर किंवा कामाचा कालावधी नमूद नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालय म्हणजे आरोग्यसेवेचे केंद्र असताना तेथे रुग्णांना त्रास होईल असे बेकायदेशीर बांधकाम अक्षम्य आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी याची तातडीने दखल घ्यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. रुग्णांची सुरक्षितता आणि सुविधा याला प्राधान्य न देता सुरू असलेली ही कारवाई सध्या जनतेच्या रोषाला सामोरी जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.





