होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिका-इराणमध्ये मोठी चकमक; ट्रम्प यांचा इराणला इशारा

State of Hormuz | होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराणच्या सैन्यामध्ये मोठी चकमक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांमधील युद्धविरामाला एक महिना पूर्ण होत असतानाच ही घटना घडली असून, यामुळे आखाती प्रदेशात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.
अमेरिकी सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या तीन युद्धनौकांवर इराणच्या लष्कराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकी सैन्याने हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. या चकमकीत युद्धनौकांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप आणि इशारा
इराणसोबतची शांतता चर्चा सकारात्मक सुरू असल्याचा दावा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “जर इराणने शांतता करारावर स्वाक्षरी केली नाही, तर भविष्यात त्यांच्यावर अतिशय भीषण, तीव्र आणि आक्रमक पद्धतीने हल्ले केले जातील,” असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणला आण्विक कार्यक्रमाची परवानगी दिल्यास ते भविष्यात त्याचा गैरवापर करतील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा
नाशिक TCS प्रकरण: फरार आरोपी निदा खानला अखेर अटक
इराणचे प्रतिआरोप
दुसरीकडे, इराणने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावत उलट अमेरिकेवरच नागरी वस्तीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने इराणच्या भूभागावर आणि सामुद्रधुनीत प्रवेश करणाऱ्या दोन जहाजांवर हल्ला केल्याचे तेहरानचे म्हणणे आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इराणने सीमा भागात आपली हवाई संरक्षण प्रणाली (Air Defense System) कार्यान्वित केली आहे.
शांतता चर्चेत अडथळे
दोन्ही देशांमधील संघर्ष कायमचा संपवण्यासाठी सध्या शांतता चर्चा सुरू आहे. यामध्ये मुख्यत्वे युद्धविराम लागू करणे, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि संघर्ष संपवण्यासाठी औपचारिक करार करणे हे तीन टप्पे विचाराधीन आहेत. या चर्चेत प्रगती होत असल्याचा दावा ट्रम्प करत असले तरी, वारंवार घडणाऱ्या अशा हिंसक घटनांमुळे करारात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. सध्या या चकमकीनंतर दोन्ही देशांनी युद्ध पुढे वाढवण्याची इच्छा नसल्याचे म्हटले असून, इराणी माध्यमांनुसार परिस्थिती सध्या सामान्य आहे.





