ठाण्यात सराफा व्यापाऱ्यानं प्रसंगावधान दाखवल्यानं दरोड्याचा प्रयत्न फसला
पिस्तूलीचा धाक दाखवून दरोडेखोरांचा दुकान लुटण्याचा प्रयत्न
ठाणे : ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला आहे. सराफा व्यापाऱ्याने प्रसंगावधान दाखवत प्रतिकार केल्याने दरोडेखोर पळून गेले. कापूरवाडी येथील बाळकूमपाडा भागामध्ये बुधवारी ही घटना घडली. या सर्व थरारक प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकून पाडा क्र.2 भागामध्ये ‘दर्शन ज्वेलर्स’ नावाचा सराफा दुकान आहे. या दुकानामध्ये सकाळी साडे अकराच्या सुमारास चार जण घुसले. यापैकी एकाकडे पिस्तूल होती आणि त्याचा धाक दाखवून दरोडेखोरांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र सराफा व्यापाऱ्याने प्रसंगावधान दाखवत प्रतिकार केला. जवळील लाकडी दांडक्याने सराफा व्यापाऱ्याने चौघांना चांगलेच चोपून काढले. या सर्व झटापटीत तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले, तर चौथ्या आरोपीला स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
हेल्मेट घातलेले चार दरोडेखोर एकाचवेळी दुकानामध्ये घुसतात. यापैकी एकाच्या हातामध्ये पिस्तूल होते. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवत सराफा दुकानदाराला धमकावले आणि मोबाईल, दागिने उचलण्यास सुरुवात केली. मात्र दुकानदाराने लाकडी दांडक्याने त्यांचा प्रतिकार केला. यावेळी दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक नागरिक गेविन रोझारियो (वय – 35) याच्यासह इतरांनी यापैकी एकाला पकडले.
याबाबत बोलताना गेविन रोझारियाने सांगितले की, ‘मी कळव्याला एका मिटिंगसाठी जात असताना फोन करण्यासाठी दर्शन ज्वेलर्सजवळ थांबलो होते. त्याचवेळी हेल्मेट घातलेले चार दरोडेखोर बाहेर पडले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मी त्यांचा पाठलाग केला. उंची 6.2 फूट असल्याने त्यातील एकाला मी पकडले. इतर नागरिकही मदतीला आले. त्याला आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.’
दरम्यान, हे सर्व आरोपी परप्रांतिय असून महिन्याभरापासून कळव्यात रहात होते. त्यांच्यावर भादवी कलमांतर्गत दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चौघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव मनोज कुमार असून स्थानिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी तो जखमी झाल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले असून स्वतंत्र पथकही नेमण्यात आल्याचे कापूरवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पोळ यांनी सांगितले.