नाशिक TCS प्रकरण: फरार आरोपी निदा खानला अखेर अटक

नाशिक | नाशिकमधील टीसीएस कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या खळबळजनक प्रकरणात गेल्या ४० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी मुख्य संशयित निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेतले असून, यामुळे या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तिचा शोध घेत होती. ती मुंब्रा किंवा नातेवाईकांकडे लपली असल्याच्या संशयावरून तपास सुरू होता, मात्र ती वारंवार पोलिसांना चकवा देत होती. अखेर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या मदतीने तिला तेथून ताब्यात घेण्यात यश आले.
हेही वाचा
दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा पाहा तुमचा रिझल्ट
दरम्यान, निदाने वकिलांमार्फत नाशिकरोड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
या तपासात पोलिसांसमोर अनेक आव्हाने होती. निदा अल्पसंख्याक बहुल वस्तीत राहत असल्याने आणि तिच्या विशिष्ट पेहरावामुळे (बुरखा/हिजाब) तिची ओळख पटवणे पोलिसांना कठीण जात होते. अशा भागात तपास करताना काही घटकांकडून धार्मिक मुद्दे पुढे केले जात असल्याने तपासावर परिणाम होत होता, तरीही पोलीस पथकांनी आपला शोध सुरूच ठेवला होता.
या प्रकरणात आतापर्यंत सातहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीडितेचे धर्मांतर करणे, तिला रोजा आणि हिजाबचे प्रशिक्षण देणे, तसेच या प्रकरणाचे मालेगाव आणि परदेशातील कनेक्शन तपासण्यासाठी निदाची चौकशी करणे पोलिसांसाठी अनिवार्य होते. आता तिला ताब्यात घेतल्याने या संपूर्ण कटामागचा नेमका उद्देश समोर येण्याची चिन्हे आहेत. सध्या तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.





