चारित्र्याच्या संशयातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून; चिंचवड हादरलं!

पिंपरी | पिंपरी-चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून, आरोपी पत्नीचं नाव चैताली भोईर असं आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. वाद चिघळत जाऊन रागाच्या भरात चैतालीने पती नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला. या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले आहेत.
हेही वाचा : ‘चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीने अटक करा’; संजय राऊतांचं विधान
घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चैताली भोईर हिला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मृत नकुल भोईर सामाजिक कार्यात सक्रिय होता. मराठा क्रांती मोर्चाच्या विविध उपक्रमांत तो सहभागी व्हायचा. तसेच अनेक सामाजिक संघटनांशी आणि राजकीय नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध होते. सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने पत्नीला राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला होता. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत त्याने पत्नी चैतालीला उमेदवार म्हणून उभं करण्याचंही ठरवलं होतं. मात्र, चारित्र्याच्या संशयातून घडलेल्या या घटनेने भोईर कुटुंबावर आणि चिंचवड परिसरावर दु:खाचं सावट पसरलं आहे.




