मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumbai-Pune Express way | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्सप्रेसवे) सोमवारी (१ जून) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक आणि क्लिनरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. तांदळाने भरलेला ट्रक, खाद्यतेलाचा कंटेनर आणि एक एर्टिगा कार यांच्यात हा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर तांदळाच्या गोण्या आणि खाद्यतेल सांडल्याने मुंबई वाहिनीवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेली माहिती अशी की, एक्सप्रेसवेवरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर ३६.५०० जवळ पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने तांदळाच्या गोण्या भरून एक ट्रक जात होता. या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने पुढे चाललेल्या खाद्यतेलाच्या कंटेनरला पाठीमागून अत्यंत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्याच वेळी शेजारच्या मार्गिकेतून (लेन) जाणाऱ्या एर्टिगा कारलाही या ट्रकने घासले.
हेही वाचा
IPL Final नंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंच्या बसला आग; सर्व खेळाडू सुरक्षित
ट्रक अन् कंटेनर रस्त्यावरच पलटी
अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की तांदळाचा ट्रक आणि तेलाचा कंटेनर दोन्ही वाहने रस्त्यावरच पलटी झाली. या दुर्घटनेत ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आणि त्यात अडकून ट्रक चालक व क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहीपर्यंत या दोघांची नावे समजू शकलेली नव्हती. अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला, तर कारमधील दोघे जण जखमी झाले. जखमींमध्ये लिलाबाई सस्ते (८०), मुकिंदा सस्ते (५६) आणि महेंद्र पाल (३९) यांचा समावेश असून, त्यांना तातडीने खोपोली ग्रामीण रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तेल अन् तांदूळ सांडल्याने वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर ट्रक मधील तांदळाच्या गोण्या फाटून तांदूळ आणि कंटेनरमधील खाद्यतेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विखुरले. यामुळे एक्सप्रेसवेच्या चारही मार्गिकांवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यंत्रणांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि रस्त्यावरील तेल-तांदूळ साफ करून वाहतूक पुन्हा पूर्ववत केली.





