कष्टकरी, शेतकरी, भुमिहीन, शेतमजुर यांचे लोकनेते हरपले- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

मुंबई |
समाजातील कष्टकरी, शेतकरी, भुमिहीन, शेतमजुर, शिक्षणाच्या प्रकाशापासून दूर राहिलेल्यांसाठी व त्यांच्या न्याय हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे असामान्य व्यक्तिमत्त्व आज हरपले. या शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला.
प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शेतकरी कामगार पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम केले. आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी लोकांशी बांधिलकी मानुन काम करणारे ते लोकनेते होते. महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी नाळ जोडून जनआंदोलनांचे नेतृत्व करणारे ते बुलंद नेते आपण गमविल्याचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी शोक संदेशात नमुद केले आहे.
शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींना त्यांनी नेतृत्व प्रदान केले. राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणून दीर्घ काळ काम करणारे प्रा. पाटील आदर्श लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत या शब्दात दरेकर यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.