सुनीता विल्यम्स पृथ्वीवर, ‘लँड’ झाली खरी : पण..?

भारतीय वंशांची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करत आता पृथ्वीवर ‘लँड’ झाले आहेत. पण, त्यांना आता शारीरिक व्याधींचा मोठा सामना करावा लागणार आहे ! सलग नऊ महिने पृथ्वीवरील वातावरणापासून दूर असल्यामुळे शरीरामधील अनेक बदल त्यांना त्रासदायक ठरतात की काय? असा नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे.
पहिले संकट ‘बेबी फूट’चे..
अंतराळात असल्यामुळे हे दोघे जमिनीवर पाय टेकण्यापासून दूर राहिले. त्यामुळे त्यांच्या पायांची अवस्था अगदी लहान मुलांच्या पावलासारखी झाली आहे. जमिनीचा स्पर्श सहन न होण्यासारखी पायांची स्थिती आहे. त्याचप्रमाणे, नियमित पौष्टिक खाण्यापासून ते नऊ महिने दूर राहिले असल्यामुळे वेगवेगळी प्रोटीन्स शरीराला मिळू शकली नाहीत, त्यामुळे त्यांच्या हाडांची, रक्ताची आणि मासाची अवस्था याची चाचणी सध्या तज्ज्ञ डॉक्टर करीत आहेत. पण, यातून स्थिर होण्यासाठी सुनीताला अजून काही महिने किंवा कदाचित काही वर्षे हे सर्व सहन करावे लागणार आहे.
नेमके काय घडले ?
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी दि. ५ जून २०२४ रोजी परीक्षणयान असलेल्या ‘स्टार लायनर’ मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. त्या ठिकाणी आठ दिवस घालवल्यानंतर आणि ठराविक माहिती गोळा केल्यानंतर ते परतणार होते. मात्र, त्यांच्या अंतराळ यानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तेथेच अडकून पडले होते. त्यांचा पूर्ण अवकाशाशी संबंध तुटण्याचे पाहून संपूर्ण जगाच्या हृदयाचा ठोका चुकला होता, हे आठवत असेलच!
शेवट गोड ते सगळे गोड..
सलग नऊ महिने अवकाशात भरकटल्यानंतर भारतीय वेळेनुसार दि. १९ मार्चच्या पहाटे हे दोघे आणि त्यांना आणायला गेलेले अन्य चौघे असे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले. फ्लोरिडाजवळ समुद्रात त्यांची पॅरॅशूट्स अलगद उतरली आणि सर्वांनी नि:श्वास टाकला.
परतीच्या प्रवासाचा थरार..
थोडा गांभीर्याने विचार केला, तर कोणतीही अंतराळ मोहीम ही जोखमीची, संकटांनी भरलेली असते. त्यात अंतराळात अडकून पडल्यानंतर या दोन अंतराळवीरांबद्दल काळजी वाटणे, अगदीच स्वाभाविक होते. रोजच जीवनमरणाचा प्रश्न, ऑक्सीजन मिळतो का? खायला मिळते का? संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले होते. त्यांच्या थरारक परतीच्या प्रवासाकडे पाहात बसणे, एवढेच पृथ्वीवरील जनतेच्या हातात होते.
हेही वाचा – श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील तुकोबारायांचे पहिले मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर
..अशी झाली मोहीम फत्ते !
सर्व प्रकारचे अडथळे दूर करत तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांना परत आणण्यासाठी स्पेस-एक्स ‘ड्रॅगन फ्रीडम’ च्या लँडिंगसाठी समुद्रातल्या आठ लँडिग साईट्स ठरवण्यात आल्या होत्या. फ्लोरिडाच्या समुद्रात होणारा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरचा हा शेवटचा ‘स्प्लॅश डाऊन’ होता.
‘हीट- शिल्ड’चे कॅप्सूलला संरक्षण
पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचे बाहेरचे तापमान वाढत असताना ‘PICA 3.0 हीट-शील्ड’ने ड्रॅगन फ्रीडमला संरक्षण दिले. दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या ‘स्पेस सूट्स’ मधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचे तापमान कमी राहायला मदत झाली. ड्रॅगन फ्रीडमला सोसावे लागणारे सर्वोच्च तापमान 1926.667 सेल्सियस म्हणजे 3500 फॅरनहाईट् इतके होते.
‘फ्रीडम कॅप्सूल’ पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीच्या दिशेने येत असताना मधला काही काळ कॅप्सूलसोबतचा संपर्क काही मिनिटांसाठी तुटला, त्यावेळी शास्त्रज्ञांचा श्वास पुन्हा घुटमळला. हा सामान्य प्रक्रियेचा भाग असतो, हे त्यांनाही माहीत होते. पण, काही काळाने हा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला.
ड्रॅगन ऑटोमॅटिक मोडवर..
वातावरणात शिरण्यापूर्वी क्रू ने खिडकीच्या झडपा बंद केल्या, त्यांच्या हातातले टॅब्लेट्स आणि इतर गोष्टी ठेवून दिल्या आणि हार्नेस घट्ट केली. ड्रॅगन हे ऑटोमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष ठेवून होता. ‘WB57 हाय अल्टिट्यूड’ विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्ये दिसत होती. ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली गेली. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल १८ हजार फुटांवर आल्यावर उघडले. तर दुसरी मुख्य जोडी साडेसहा हजार फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आले. मोहीम फत्ते झाली होती, सगळे अंतराळवीर सुखरूप उतरले होते. भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी स्प्लॅश डाऊन झाला.. सगळीकडे एकच जल्लोष झाला. ‘वेलकम सुनीता’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला !
क्रू नाईन बॅक ऑन अर्थ..
अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे १७ तासांचा होता.’ क्रू नाईन बॅक ऑन अर्थ..वेलकम होम’ अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचे स्वागत केले. ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. असे केल्याने पॅराशूट्सोबत कॅप्सूल प्रवाहात ओढली जात नाही, हे लक्षात घ्यायला हवे !
फास्ट बोट्स तातडीने रवाना..
त्याआधी फास्ट बोट्स पोहचल्या, त्यांनी समुद्रात पडलेली पॅराशूट्स गोळा केली. शिवाय समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्सही करण्यात आले. त्यानंतर स्पेस-एक्सच्या फ्लाईट सर्जननी कॅप्सूलमधील अंतराळवीरांशी संवाद साधला. अंतराळवीरांच्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यात आले.
सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर..
स्पेस-क्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारे पाणी लागल्याने या पत्र्याची झीज होते. म्हणूनच कॅप्सूलवर गोड पाणी मारून समुद्राचे पाणी काढले जाते. यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा ‘साईड हॅच’ उघडण्यात आला. पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो.
बाहेर येण्यासाठी रॅम्पचे प्रयोजन
हॅच उघडल्यानंतर वैदयकीय टीमपैकी एकजण कॅप्सूलमध्ये गेला. तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला. ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आले. सगळ्यात आधी ‘नासा’ चे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढले गेले. त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल बाहेर काढण्यात आले.
महत्त्वाच्या शारीरिक तपासण्या
तेथे हजर असलेले डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करतात. दीर्घकाळ अंतराळात घालवून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची आणि त्यानंतरची प्रक्रिया ठरलेली असते. मेडिकल चेकअप नंतर क्रू जमिनीवर परतेल. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले हे मिशन अखेर यशस्वी झाले आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिच्या सहकार्यांना भरपूर आरोग्य लाभो, एवढीच अपेक्षा आणि प्रार्थना !