“एक मुट्ठी अनाज” उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजले सामाजिक भान
शिक्षण विश्व: मोशीतील प्रियदर्शनी स्कूलचा कौतुकास्पद उपक्रम

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
प्रियदर्शनी स्कूल, मोशी यांच्यातर्फे “एक मुट्ठी अनाज” या उपक्रमांतर्गत दुसऱ्या वर्षीही अन्नदान अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शाळेच्या शिक्षकवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गरजू संस्थांसाठी धान्य, खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक साहित्याचे संकलन केले.या अभियानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये यामुळे सामाजिक जाणवेची मूल्ये रुजली गेली.
शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रेड्डी , रझिया लखानी, ईपीटीए सदस्य शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी मिळून स्वामी समर्थ वृद्धाश्रम (चिखली), सावली निवारा (पिंपरी) आणि अंधशाळा (भोसरी) या तीन संस्थांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी संकलित साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रेमपूर्वक सुपूर्द केले.
हेही वाचा : अन् त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!
या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक क्षेत्राचा अनुभव घेता आला. समाजातील दुर्बल घटकांच्या अडचणी, गरजा आणि त्यांना दिलासा देण्याचे महत्त्व या भेटीद्वारे त्यांना समजले. विद्यार्थ्यांच्या मनात सहानुभूती, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची बीजे रोवली गेली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञान नव्हे, तर माणुसकी आणि जबाबदारीचे भावही रुजले असून, हा उपक्रम भावी काळातही अधिक व्यापक रूपात राबवण्याचा निर्धार शाळेने व्यक्त केला आहे.



