फिफा वर्ल्डकप २०२६ मध्ये पैशांचा पाऊस! जाणून घ्या कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार?

FIFA WC 2026 | फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले आहेत. सध्या या स्पर्धेतील ‘राऊंड ऑफ ३२’ फेरीचे सामने खेळवले जात असून, लवकरच हाय-व्होल्टेज ‘राऊंड ऑफ १६’ फेरीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ४८ संघांनी सहभाग घेतल्याने ही स्पर्धा अधिक भव्य ठरली आहे. यातच फिफाकडून (FIFA) बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली असून, फुटबॉल इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वोच्च रक्कम ठरणार आहे.
फिफाने एप्रिल महिन्यातच या स्पर्धेसाठीचा एकूण आर्थिक निधी (Total Distribution Pool) वाढवून तब्बल ८७१ मिलियन डॉलर्स केला आहे. यामध्ये केवळ कामगिरीवर आधारित बक्षिसांची रक्कम (Performance Prize Pool) ६५५ मिलियन डॉलर्स इतकी आहे.
या महाकुंभातील विजेता, उपविजेता आणि वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये पोहोचणाऱ्या संघांना किती कोटींची रक्कम मिळणार, याचे सविस्तर गणित खालीलप्रमाणे आहे.
विजेता आणि उपविजेत्याला मिळणारी रक्कम
वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ मालामाल होणार असून उपविजेत्यावरही पैशांचा पाऊस पडणार आहे.
विजेता संघ (Champion): ५१ मिलियन डॉलर्स (सुमारे ४३३ कोटी रुपये)
उपविजेता संघ (Runner-up): ३४ मिलियन डॉलर्स (सुमारे २८९ कोटी रुपये)
तिसरे स्थान (3rd Place): ३० मिलियन डॉलर्स (सुमारे २५५ कोटी रुपये)
चौथे स्थान (4th Place): २८ मिलियन डॉलर्स (सुमारे २३८ कोटी रुपये)
हेही वाचा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे पालखी आगमनाची जय्यत तयारी
नॉकआऊट फेरीत पोहोचणाऱ्या संघांची चांदी
स्पर्धेत जशीजशी संघांची घोडदौड पुढे जाईल, तशी त्यांची बक्षिसांची रक्कमही वाढत जाणार आहे.
टॉप ८ (Quarter-Finals): २० मिलियन डॉलर्स (सुमारे १७० कोटी रुपये)
राऊंड ऑफ १६ (Round of 16): १६ मिलियन डॉलर्स (सुमारे १३६ कोटी रुपये)
राऊंड ऑफ ३२ (Round of 32): १२ मिलियन डॉलर्स (सुमारे १०२ कोटी रुपये)
राऊंड ऑफ ३२ मध्ये न पोहोचणारे संघ (Group Stage): १० मिलियन डॉलर्स (सुमारे ८५ कोटी रुपये)
प्रत्येक संघाला किमान १०६ कोटींची गॅरंटी!
या स्पर्धेत केवळ कामगिरीवर आधारित बक्षिसे दिली जाणार नाहीत, तर फिफाकडून सहभागी होणाऱ्या सर्व ४८ संघांना एकत्रितपणे १६८ मिलियन डॉलर्सचे वाटप केले जाणार आहे.
प्रत्येक संघाला स्पर्धेची तयारी, सराव, प्रवास आणि इतर आवश्यक खर्चासाठी २.५ मिलियन डॉलर्सचा अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे. त्यामुळे फिफा वर्ल्डकप २०२६ साठी पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला किमान १२.५ मिलियन डॉलर्स (सुमारे १०६ कोटी रुपये) मिळण्याची खात्री आधीच मिळाली आहे, मग तो संघ पहिल्याच फेरीत बाहेर का होईना!





