Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होतं? केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलं स्पष्टीकरण

Hardeep Singh Puri | अमेरिका व इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा प्रश्न निर्माण झाला असतानाच, देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतात गेल्या काही महिन्यांपासून इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर वेगाने वाढवला जात असून सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळले जात आहे. मात्र, या इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांचे नुकसान होते किंवा मायलेज कमी होते, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. या सर्व आक्षेपांवर आणि गैरसमजांवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

पत्रकार परिषदेत इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मायलेज कमी होण्याच्या दाव्यावर बोलताना हरदीप सिंग पुरी म्हणाले, “काही लोकांचे म्हणणे आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांचे मायलेज कमी होते. पण आता हे सिद्ध झाले आहे की इथेनॉलचा वापर थेट रेसिंग कार्समध्ये (Racing Cars) देखील केला जातो, कारण यामुळे वाहनाचे अ‍ॅक्सलरेशन (वेग घेण्याची क्षमता) उत्तम होते. जर मायलेजचाच मुद्दा असेल, तर ते काही प्रमाणात कमी होऊ शकते, पण मायलेज कमी होण्यामागे केवळ इथेनॉल नाही तर इतरही अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.”

हेही वाचा

भुशी धरण ओव्हरफ्लो; लोणावळ्यात वर्षाविहाराला सुरुवात

इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर करणाऱ्या वाहनांना विमा कंपन्या क्लेम किंवा सेवा नाकारत असल्याच्या अफवांवरही त्यांनी कडक शब्दांत उत्तर दिले. “काही घटकांनी असा दावा केला की इन्शुरन्स कंपन्या इथेनॉल वापरणाऱ्या वाहनांना विमा संरक्षण पुरवत नाहीत. मात्र, विमा कंपन्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की अशा प्रकारचा कोणताही नियम नसून हा दावा पूर्णपणे खोटा आहे. हा निर्णय आम्ही सर्वांशी चर्चा करूनच घेतला असून, यामध्ये ‘सियाम’ (SIAM) आणि ‘एआरएआय’ (ARAI) या ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वोच्च संस्थांचाही समावेश आहे.”

२५ टक्के इथेनॉल मिश्रणाबाबत मंत्र्यांचे महत्त्वाचे आश्वासन

अशा प्रकारचे गैरसमज पसरवून नक्की कोणाचा फायदा होतो आहे, असा सवाल उपस्थित करत पेट्रोलियम मंत्र्यांनी भविष्यातील नियोजनावरही प्रकाश टाकला. “मी कोणावरही थेट आरोप करणार नाही. पण भारतीय बाजारपेठ इतकी मोठी आहे की येथे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाला वाव आहे. भारतात एकाच वेळी इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि फ्लेक्स फ्युएल (दोन प्रकारच्या इंधनांवर चालणारी) वाहने एकत्र धावू शकतात. सध्या आपण पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळत आहोत. भविष्यात जर आपण २० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला, तर तो सर्व आवश्यक कायदेशीर व तांत्रिक चाचण्यांची पूर्तता केल्यानंतरच घेतला जाईल,” असे आश्वासन हरदीप सिंग पुरी यांनी देशवासीयांना दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button