मध्य रेल्वेचं दिवाळी गिफ्ट! मराठवाडा, कोकण आणि कोल्हापूरसाठी मुंबईहून 14 विशेष गाड्यांच्या 325 फेऱ्या

पुणे | दिवाळी आणि छठ पूजेच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने विविध मार्गांवर धावणाऱ्या 14 विशेष रेल्वेगाड्यांच्या 325 फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या विशेष गाड्या 24 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत धावणार आहेत. या गाड्यांमुळे मराठवाडा, कोकण, कोल्हापूर आणि उत्तर भारतातील प्रवाशांचा गावी जाण्याचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
या विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुरू होणार आहेत. या गाड्या मराठवाड्यातील लातूर, कोकणातील सावंतवाडी रोड आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर अशा महत्त्वाच्या ठिकाणांसाठी सोडल्या जाणार आहेत.
– LTT – लातूर (01007): 28 सप्टेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रत्येक रविवारी धावणार आहे (10 फेऱ्या).
– CSMT – कोल्हापूर (01417): 25 सप्टेंबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रत्येक गुरुवारी धावणार आहे (10 फेऱ्या).
– LTT – सावंतवाडी रोड (01179): 17 ऑक्टोबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी धावणार आहे (4 फेऱ्या).
हेही वाचा : “एक मुट्ठी अनाज” उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजले सामाजिक भान
याव्यतिरिक्त उत्तर भारत, विदर्भ आणि दक्षिण भारतातील प्रवाशांसाठीही विशेष गाड्या उपलब्ध आहेत. दानापूर, करीमनगर, मुजफ्फरपूर, बनारस, गोरखपूर, मऊ, आसनसोल, तिरुवनंतपुरम आणि नागपूर या प्रमुख शहरांसाठीही विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. विशेषतः LTT ते दानापूर (01017 आणि 01143) आणि CSMT ते गोरखपूर (01079) या मार्गांवर सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग सुरू झाले असून, प्रवाशी ते www.irctc.co.in या संकेतस्थळावर तसेच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर करू शकतात. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲप वापरून तपशीलवार वेळापत्रक, थांबे आणि सीटची उपलब्धता तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.




