पिंपरी-चिंचवडमध्ये झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसनला गती!
PCMC : शहरात HDH सदनिका वाटपास मंजुरीची शिफारस

पिंपरी-चिंचवड | शहरातील रस्ता बाधित व प्रकल्पग्रस्त झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेच्या आरक्षण क्र. ७९ (बेघरांसाठी घरे – HDH) प्रकल्पांतर्गत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मा. कृष्णा सुरकुले आणि मा. सारिका गायकवाड यांनी संयुक्त प्रस्ताव सादर केला असून, या प्रस्तावावर प्रशासकीय स्तरावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सुमारे १६१ पात्र प्रकल्पग्रस्तांना HDH योजनेअंतर्गत सदनिका देण्यास मंजुरी देण्यात आली असून, याबाबतची शिफारस आता महापालिका सभेकडे पाठविण्यात आली आहे.झोपुप्रा मार्फत दि. ०९/०४/२०२५ रोजीच्या आदेशानुसार सि.स.नं. ६३६७ (स.नं. ११०) येथील प्रकल्पात सि.स.नं. ६३३३ (स.नं. ९९ पै) मधील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना HDH योजनेतील सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आता आरोग्य व वैद्यकीय समिती
तथापि, सदनिकांच्या वाढलेल्या किमतींमुळे लाभार्थ्यांकडून सातत्याने मागणी होत असल्याने, पंतप्रधान आवास योजनेतील दरांच्या अनुषंगाने किंमत निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगररचना व विकास विभागाच्या दि. १२/१२/२०२५ च्या प्रस्तावानुसार सदनिकेचे मूल्य ११,०१,२७० रुपये निश्चित करण्यात आले असून, यास आयुक्तांची मान्यता मिळाली आहे.
अटी व शर्तीद्वारे सदनिका देणार…
या निर्णयाअंतर्गत लाभार्थ्यांना काही अटी व शर्तींवर सदनिका देण्यात येणार आहेत. त्यामध्ये— निश्चित केलेली सदनिका स्वीकारणे बंधनकारक, किंमतीतील फरक असल्यास तो लाभार्थ्यांकडून वसूल किंवा परतावा देण्याची तरतूद, सदनिकेत अंतर्गत बदल करण्यास बंदी, देखभाल, वीज, पाणी व इतर खर्च लाभार्थ्यांकडून भरपाई, पार्किंग क्षेत्र सामाईक राहणार, कर व इतर शुल्क वेळोवेळी महापालिकेस भरणे बंधनकारक, नोंदणीकृत करारनामा व इतर कागदपत्रे लाभार्थ्यांनी स्वतःच्या खर्चाने पूर्ण करणे या धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर हक्काचे घर उपलब्ध होऊन त्यांची दीर्घकाळची गैरसोय दूर होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.





