सारंग आव्हाड पिंपरी-चिंचवडचे नवे अपर पोलिस आयुक्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी सारंग आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली.
भारतीय पोलिस सेवेतील १२ अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. त्यामध्ये परदेशी यांची नागपूर शहरच्या अपर पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांची नियुक्ती झाली आहे.
हेही वाचा – सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग; तीन कामगार होरपळले
सारंग आव्हाड १९९६ मध्ये राज्य पोलिस दलात उपअधीक्षक म्हणून भरती झाले. सुरुवातीस जळगाव, इस्लामपूर येथे उपअधीक्षक म्हणून कामगिरी बजावल्यानंतर ठाणे महामार्ग पोलिस अधीक्षक, सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त, पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक, परभणी आणि बुलढाणा पोलिस अधीक्षक, नागपूर येथे उपायुक्त, पुणे वाहतूक शाखेचे उपायुक्त, सीआयडीचे पोलिस महानिरीक्षक म्हणून काम केले आहे.