नागपूरमधील तिरंगा रॅलीतून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा, “जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी…”

DEVENDRA FADNAVIS : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापरखेडा या गावात भाजपच्या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. खापरखेडा येथील अन्नामोड या चौकातून ही तिरंगा यात्रा सुरू झाली.
यावेळी एका सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करत ‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान…’ असा इशारा पाकिस्तानला दिला. खापरखेड्यात यात्रा आयोजित करण्यासाठी सावनेरचे भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी पुढाकार घेतला. या दोन्ही यात्रांमध्ये भाजपचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार यांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी देवेंद्र फडणवसांनी माध्यामांशी देखील संवाद साधला.
हेही वाचा – सारंग आव्हाड पिंपरी-चिंचवडचे नवे अपर पोलिस आयुक्त
फडणवीस म्हणाले की, “जेव्हा देशाचे प्रधानमंत्री 2014 मध्ये मेक इन इंडियाचा नारा द्यायचे. तेव्हा लोक जुमला आहे असं म्हणत होते. मात्र आता इतर देश आपल्याला शस्त्राची मागणी करत आहे. ब्राह्मोस या आपल्या डिफेन्स कॅपॅबिलिटीची मागणी जग करत आहे. स्वतःच देशाचं संरक्षण करण्यासाठी सर्वात अद्यावत शस्त्रास्त्र हे भारताकडे आहे हे जगाला कळलं आहे. तुर्की सारखा देश दहशतवादाला पाठिंबा देतोय. मानवते विरुद्धचा हा अपराध आहे. त्या विरोधात भारतीयांनी व्यवहार करण्यास नकार दिला, त्या बद्दल मी भारतीयांचे स्वागत करतो.”
काँग्रेसवर हल्लाबोल करत फडणवीस म्हणाले, “काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली. आमची अपेक्षा एवढीच असेल की त्यांनी ती यात्रा राजकीय यात्रा करू नये. आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. ज्या पद्धतीने राहुल गांधी कालपासून बोलायला लागलेत, भारतीय सेनेप्रति अविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवतात, दुसरीकडे जय हिंद यात्रा काढता, जयहिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी तुम्ही विश्वास दाखवाल,”असे म्हणत फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.