सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग; तीन कामगार होरपळले

सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरातील ‘सेंट्रल इंडस्ट्री’ या टॉवेल निर्मिती करणाऱ्या कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागली. ही आग रात्री तीनच्या सुमारास लागली असून, या दुर्घटनेत तीन कामगार गंभीर होरपळले आहेत. तसेच आतमध्ये पाच ते सहा कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या तातडीने दाखल झाल्या आहेत. बचाव कार्य वेगात सुरू असून, आतापर्यंत तिघा जणांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले आहे. आग अद्यापही धुमसत असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
अग्निशमन दलासोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या मदतीने कारखान्याचा काही भाग तोडून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे, तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्घटनेमुळे सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.